शिक्षण आयुक्तांनी सखोल तपासणी केली नसल्याने नांदेडच्या शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण…….!

नांदेड:- (सखाराम कुलकर्णी)नांदेडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची झाडाझडती घेण्यास शिक्षण आयुक्त सुरज मांढरे येणार म्हटले की नांदेड शिक्षण विभागातील सर्वांचे धाबे दणाणले होते. पण शिक्षण आयुक्त दोन दिवसा ऐवजी फक्त दोन तासच कार्यालयात थांबून प्राथमिक व माध्यमिक विभागाची थोडी थोडी वर वर काही प्रकरणाची तपासणी केली व निघून गेले. यामुळे त्यांच्या वेळेअभावी बला टळली गेली, अशा चर्चेला उधाण येऊन नांदेड शिक्षण विभागात आनंद व्यक्त करण्यात येत आहे . शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष ख्याती असलेले शिक्षण आयुक्त सुरज मांढरे नांदेडला येण्याचा प्रोग्राम आला की प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी ( प्राथ.) श्रीमती सविता बिरगे,व शिक्षणाधिकारी ( माध्य. ) प्रशांत दिग्रसकर सह सर्व कर्मच्यार्यात घबराटीचे वातावरण पसरून सर्वांचे धाबे दणाणले होते. फायलींची जमवाजमव, कागदावर कागद लावण्यास युद्धपातळीवर शिपायापासून शिक्षणाधिकारी पर्यंत कामाला लागले होते. आमच्या माध्यमिक शिक्षण विभागात असलेला शिपाई १५ ते २० वर्षापासून पुनर्नियुक्तीवर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेकडे कार्यरत असल्यामुळे त्याचे वर्चस्व चांगले असून मांढरे यांच्या तपासणीमुळे त्याचे पण धाबे दणाणले होते. कारण शिक्षणाधिकाऱ्या नंतर हेच साहेब असतात. त्यामुळे हा शिपाई पण कामाला लागला होता. शेवटी शिक्षण आयुक्त यांचा रीतसर दौरा आला व त्यात कार्यालयात तपासणीसाठी फक्त एक तास असल्याचे नमूद होते. आयुक्त कार्यालयात आल्यावर त्यांनी जवळपास दोन तास प्राथमिक व माध्यमिक विभागात ठाण मांडून काही रजिस्टर काही संचिका तपासल्या. आयुक्त मांढरे यांचे असे एक वैशिष्ट्य आहे की ते चर्चा कमी करतात तर फाईली, कागद तपासण्यासाठी जास्त वेळ देतात. बारकाईने अभ्यास करून त्यातील उणिवांची नोंदी ठेवतात . रजिस्टर व फायली पाहत असताना बऱ्याच ऊनिवा त्यांना जाणवल्या तर काही रजिस्टर चे फोटो काढून पण घेतलेत . बऱ्याच संचिकांचा निपटारा वेळेत होत नाही. सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी होत नाही.तसेच कामात अनियमितता दिसून आली. ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. माहितीच्या अधिकाराचे गांभीर्य शिक्षण विभागाला नाही .जन माहिती अधिकारी माहिती अधिकारात मागितलेली माहिती बहुतेक देतच नाहीत.हा फार मोठ्या कायद्याचा भंग होऊ शकतो. आयुक्तांनी दोन तासात काही प्रमुख संचिका व रजिस्टर चि तपासणी करून १५-१६ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या. पण मोठे मासे मांढरे यांच्या गळाला यायचे राहिले. कारण सविस्तर व वस्तुनिष्ठ तपासणी होऊ शकली नाही. वेळेअभावी शिक्षण आयुक्त यांचा धावता दौरा होता. पण या दौऱ्यामुळे शिक्षण विभाग गेली आठ ते दहा दिवसापासून घबराटीच्या व चिंतेच्या वातावरणात होता. शेवटी आयुक्त आले व थोडीफार वर वर तपासणी करून गेले. याचा आनंद शिक्षण विभागात पाहायला मिळाला व एकदाची बला टळली असे ही काही प्रमुख कर्मचाऱ्यात बोलल्या जाऊ लागले आहे.आता या तपासणी वर आयुक्त कोणाकोणा वर व काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



