*प्रकाश शिंदे यांची महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती *

भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानीनगर तालुका इंदापूर येथील महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार कल्याण मंडळ पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त कर्मचारी/ कॉम्प्युटर ऑपरेटर प्रकाश शिंदे यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे डॉ.श्री.राजेश देशमुख यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 22 मे 2023 नुसार नेमणूक केली आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी महसूल सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने डॉ.राजेश देशमुख जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या हस्ते त्यांना नेमणुकीचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी गृह शाखेचे तहसीलदार धनंजय जाधव गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारतीताई चव्हाण तसेच गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातून एकूण 55 गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कामगारांची नेमणूक झाली असून सदरची नेमणूक ही गुणवंत कामगार कोठयातून करण्यात आली आहे. सदरची नेमणूक ही सदरच्या व्यक्तीच्या वयाचे 70 व्या वर्षापर्यंत राहणार आहे. तसेच नेमण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांची शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती /शांतता समितीवर पोलीस आयुक्त /जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

प्रकाश शिंदे हे सणसर येथे गेली 45 वर्षापासून प्रसिद्ध असणारे, विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, सणसर गावाला सन 2009-10 चा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम रक्कम रुपये 10 लाखाचा पुरस्कार मिळवून देण्यात मोठा सहभाग असणारे, महाराष्ट्र शासनाचे इंदापूर तालुक्यातून उत्कृष्ट तरुण मंडळ म्हणून प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह मिळविणारे तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचा अनेक वर्षे गणराया अवार्ड पुरस्कार मिळवणारे, वै. ह.भ.प.गणपतबुवा काळे महाराज यांचे शुभ हस्ते श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा झालेल्या *आझाद तरुण मंडळ सणसर* यांचे ते संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे ते पुणे जिल्हा ग्रामीणचे व ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती इंदापूर तालुका यांचे ते अध्यक्ष आहेत. प्रकाश शिंदे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी निवडीने अनेक शालेय विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य लोकांना त्यांच्या सत्य प्रति साक्षांकित करणेकामी मोठी सोय होणार असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सदरचे विशेष कार्यकारी अधिकारी निवडीसाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी विशेषतः सौ.भारतीताई चव्हाण अध्यक्षा, सहसचिव श्री संजय गोळे, पुणे शहराध्यक्ष श्री महादेव धर्मे व त्यांचे सहकाऱ्यांनी सततचा पाठपुरावा करून विशेष प्रयत्न केले.



