ताज्या घडामोडी

कॅमेर्‍यानं माझं आयुष्य घडवलं – योगेश शिंदे..

आंबेडकर महाविद्यालयात 'भव्य कॅमेरा प्रदर्शन' संपन्न..

Spread the love

कॅमेर्‍यानं माझं आयुष्य घडवलं – योगेश शिंदे..आंबेडकर महाविद्यालयात ‘भव्य कॅमेरा प्रदर्शन’ संपन्न

आवाज न्यूज : पुणे, औंध,  प्रतिनिधी .४ डिसेंबर :

“कॅमेर्‍यानं माझं आयुष्य घडवलं, कॅमेर्‍याने मला कधी उपाशी ठेवले नाही, कॅमेरा सगळ्यांकडेच असतो, पण खरा कॅमेरा हा स्वतःमध्ये असायला हवा,” असे मत रील स्टार व प्रसिद्ध फोटोग्राफर योगेश शिंदे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात, फोटोजर्नलिझम व कॅनाॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य कॅमेरा प्रदर्शनाच्या प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन औंध आय. टी. आय.च्या फोटोग्राफी विभागाचे प्रमुख मा. गणेश भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश रणदिवे हे होते.

पुढे बोलताना योगेश शिंदे म्हणाले की, “आज मी जो काही आहे तो, फक्त आणि फक्त कॅमेऱ्यामुळेच. कॅमेऱ्याने मला कधी उपाशी ठेवलं नाही. हल्ली कॅमेरा हा सगळ्यांकडेच असतो, मोबाईलचे कॅमेरे देखील अद्ययावत झाले आहेत. पण जोपर्यंत आपल्यात कॅमेराचा परस्पेक्टीव्ह आणि व्हिजन येत नाही तोपर्यंत आपण एक चांगला फोटो काढू शकत नाही. ज्याला आपल्या मनातील चित्र फोटोच्या फ्रेममध्ये उतरवता येते तो खरा फोटोग्राफर असतो. यायला हवे. हेच म्हणजे तर फोटोग्राफी. रिल्सच्या माध्यमातूनही चांगले करिअर घडविता येते, ज्याचा आजच्या तरुणाईने विधायकपणे वापर करायला हवा.”

यावेळी बोलताना प्रा. गणेश भुजबळ यांनी ‘फोटोजर्नलिझम’ या कोर्सचे विद्यमान विद्यार्थी तसेच या कोर्स द्वारे घडलेल्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “डॉ.आंबेडकर महाविद्यालयात अतिशय माफक दरात फोटोग्राफी व पत्रकारिता शिकवली जाते. हीच कौशल्ये बाहेर घ्यायला गेल्यास लाखो रुपये फीस भरावी लागते. प्रा.चंद्रकांत बोरुडे हे अतिशय उत्तमरीत्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. भविष्यात या कोर्समधील विद्यार्थी नक्कीच इतिहास घडवतील. असा विश्वास मला वाटतो.”

डॉ.रमेश रणदिवे यावेळी म्हणाले कि, “कॅमेरा ही खूप महत्वाची वस्तू आहे, तसेच कॅमेरा हाताळणाराहि तेवढाच महत्वाचा असतो. पुण्यातील अनेक महाविद्यालयांकडे बघितले, तर आपल्या महाविद्यालयाची फी अतिशय माफक आहे. निश्चितच याचा फायदा विद्यार्थी घेत आहेत आणि कित्येक विद्यार्थी या कोर्स द्वारे घडताना दिसत आहेत, याचा आनंद होतो.”

प्रदर्शनाच्या उद्घाटना प्रसंगी डॉ.सविता पाटील, कॅनॉन इंडियाचे प्रतिनिधी दीपक गोर्डे, हितेश ओझा, विवेक कोकमथामकर, अनिल बेलदार, विश्वजित गायकवाड, किरण गायकवाड, अक्षय होळकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक/प्राध्यापिका व फोटोजर्नलिझम या कोर्सचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत बोरुडे केले तर, आभार मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी मानले. या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!