श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने दिनांक २४सप्टेंबर रोजी तळेगावातील ढोल ताशा पथकांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता.
सरावादरम्यान येणाऱ्या अडचणी, पुणे शहरात वादनाची संधी, तळेगाव साठी महासंघाची एक शाखा तयार करावी अशा अनेक विषयांची मांडणी केली गेली पथकांच्या माध्यमातून केले जाणारे विविध सामाजिक उपक्रम यांचा सुद्धा उल्लेख सर्व प्रमुखांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला.
श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने दिनांक २४सप्टेंबर रोजी तळेगावातील ढोल ताशा पथकांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता.
आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे २७ सप्टेंबर.

तळेगावच्या सांस्कृतिक नगरीत प्रथमच अशा प्रकारच्या प्रशंसनीय कार्यक्रम श्री गणेश मोफत वाचनालयाच्या क्षमा अरविंद शहा सभागृहात घेण्यात आला,या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष परागजी ठाकूर,प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष. रविंद्र दाभाडे हे उपस्थित होते. तसेच महासंघाचे संघटक अनुप साठे, पिंपरी चिंचवड विभाग महासंघाचे प्रमुख. विशाल मानकर,सदस्य. निघोजकर व पुण्यातील जेष्ठ पत्रकार. प्रसाद सराफ हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व श्री गणेशाच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित पथकातील प्रमुखांनी आपले मनोगत सर्वांसमोर मांडले या मनोगतामध्ये प्रामुख्याने सरावासाठी जागा, प्रशासनाशी एक चांगला संवाद, सरावादरम्यान येणाऱ्या अडचणी, पुणे शहरात वादनाची संधी, तळेगाव साठी महासंघाची एक शाखा तयार करावी अशा अनेक विषयांची मांडणी केली गेली पथकांच्या माध्यमातून केले जाणारे विविध सामाजिक उपक्रम यांचा सुद्धा उल्लेख सर्व प्रमुखांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये पूर्वी तळेगावातील सांस्कृतिक चळवळ कशी होती व त्याच परंपरेप्रमाणे आताही सर्व वादक आपल्या पथकाच्या माध्यमातून ती कशी जपतात याबद्दल कौतुक केले. प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण तळेगाव मध्ये ढोल ताशा महासंघाची तळेगाव विभागाची शाखा सुरू झाल्याचे जाहीर करत आहोत असे सांगितले. ढोल ताशा महासंघाची निर्मिती कशी व कधी झाली, ज्ञान प्रबोधिनीच्या आप्पा पेंडसे यांनी पथक संस्कृतीची सुरुवात केली. मावळ ,मुळशी कडून ढोल ताशाची ही संकल्पना शहराकडे आणली.

१८९२ साली खाजगीवाले हे ग्वाल्हेरला गेले होते तिथला गणेशोत्सव पाहिला व त्यांनी १८९३साली पुण्यात खाजगीवाले, घोटवडेकर आणि भाऊ रंगारी अशा तीन गणपतीची सुरुवात केली. त्यानंतर टिळकांनी हा उत्सव सार्वजनिक करायचं ठरवले आणि गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव आपल्या महाराष्ट्राला दिले. १८९४ साली साधारणता पुण्यामध्ये 100 मंडळाची सुरुवात झाली. गणेशोत्सवात बळ कोणामुळे मिळते तर ते आपल्यासारख्या ढोल ताशा वादकांमुळे, संकटांची संधी करणारे कोण लोक असतात तर ते ढोल ताशा वादक आणि अशा ढोल ताशा वादकांना लोकाश्रयाची गरज असते आणि तो लोकाश्रय सध्या आपल्याला मिळतोय त्यामुळे आपण आपले वादन सगळ्यांसमोर उत्तमरीत्या सादर करू शकतो असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी हे ब्रम्हांड निर्माण झालं ते कसे झालं आणि ह्या ब्रह्मांडामध्ये सर्वात पहिला जो नाद उठला तो ओंकाराचा नाद होता त्यानंतर शंकराने जे तांडव केलं या तांडवात शंकरांनी आपल्याकडचं जे डमरू फेकले ते डमरू तुटले व त्यापासून संबळ तयार झाले या संबळामध्ये दोन भाग आहे ह्यातील एक पुरुष आणि दुसरी प्रकृती. ब्रह्मदेवांनी तांडवा बरोबर वादनासाठी जे वाद्य निर्माण केले ते म्हणजे मृदुंग मातीचे अंग असलेले वाद्य.हे पहिले वाद्य कोणी वाजवले तर ते गणपतींनी वाजवले म्हणून या ढोल ताशा पथकामध्ये ढोल वाजवणाऱ्यांना श्री गणेशाची सेवा करण्याची संधी मिळते असे म्हटले जाते.
पथक संस्कृतीमध्ये पथकाच्या अग्रभागी भगवा ध्वज असतो बाबासाहेबांनी जाणता राजांमध्ये सांगितले की पहिला सूर्योदय झाला त्यावेळी जन्माला आला तो हा भगवा ध्वज. या भगव्या ध्वजाचा रंग कसा आहे तर अरणीच्या सूर्योदय प्रमाणे. भगव्या ध्वजाचा आकार हा यज्ञकुंडाप्रमाणे त्यातून येणाऱ्या ज्या ज्वाला असतात तसा आहे म्हणून पथकामध्ये सर्वात प्रथम या ध्वजाचे वंदन केले जाते ध्वजाला ध्वज प्रणाम केला जातो तो ध्वज उघडला जातो आणि मगच आपल्या वादनाला सुरुवात होते ध्वजधारींना पहिला नमस्कार केला जातो.
संस्कृती म्हणजे काय तर ही मृदुंगाच्या जातकुळीतील वाद्य ढोलाला दोन पानं आहेत आणि या दोन पानांच्या मध्ये ब्रम्हांड आहे त्यामुळे आपण टिपरुचा आघात करतो त्यावेळी घुमार ऐकू येतो त्यामुळे ढोलाचा आवाज हा लांबपर्यंत ऐकू येतो म्हणून जो ढोल वाजवतो त्याचं नातं हे गणेशाशी आहे त्यामुळे आपण त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे अशा प्रकारे अतिशय उत्तम प्रकारे परागजींनी सर्वांशी संवाद साधला.
शेवटी सर्व पथकातील वादकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यानंतर सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला सर्व पथकातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्हा सर्व पथकांच्या वतीने श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाचे खूप खूप आभार त्यांनी अशा प्रकारचा अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल सर्वांच्या वतीने आभार व्यक्त केले.



