तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत तळेगाव दाभाडे शहरामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपुरक पध्दतीने साजरा करावा. विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी त.दा.न.प.
गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य संकलन करणेसाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दररोज ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरविण्यात येणार आहे,
सार्वजनिक गणेशोत्सव २०२२
आवाज न्यूज::तळेगाव दाभाडे १ सप्टेंबर. 
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत तळेगाव दाभाडे शहरामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपुरक पध्दतीने साजरा करणेसाठी व जलप्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन तलाव, विहीर नदी व इतर नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये न करता नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या केंद्रावर मूर्तीदान करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांच्या सोयीकरिता गाव विभागामध्ये गाव तळे शेजारी, बनेश्वर मंदिर जवळ, गोपाळे गुरुजी यांचे घराशेजारी, जुने नगरपरिषद कार्यालय, आदर्श शाळेजवळ, तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालय, मारुती मंदिर चौक स्टेशन विभागामध्ये यशवंतनगर (गोल ग्राउंड), एम.एस.ई.बी. कार्यालय जवळ (स्टे. तळे), नवीन समर्थ विद्यालय, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६ ह्या ठिकाणी मूर्तीदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
तसेच ज्या नागरिकांना घरचेघरी मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे अशा नागरिकांना नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद कार्यालय व संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६ या दोन ठिकाणी अमोनियम बाय कार्बोनेट पावडरचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य संकलन करणेसाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दररोज ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरविण्यात येणार आहे, तसेच मूर्तीदान केंद्राच्या ठिकाणीही निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशात टाकावे असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.



