ताज्या घडामोडी

विकासकामांच्या नावाखाली विनापरवाना वृक्षतोड ; पालिका प्रशासनाची मूकसंमती ? 

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील भुयारी गटार प्रकल्पाच्या कामादरम्यान अनेक झाडांची विनापरवाना कत्तल केल्याची घटना समोर आली असून त्यामुळे निसर्गप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. कृष्णाआकार सोसायटी मागील नैसर्गिक ओढ्यालगत जवळपास 40 झाडे मुळासकट उखडून टाकण्यात आली आहेत.तर इतर अनेक झाडांची मोडतोड करत ईजा पोहोचवली गेली आहे.

गेली दोन-तीन दिवस ही वृक्षतोड सुरू असून झाडे तोडण्याची परवानगी संबंधित ठेकेदाराकडे नसल्याची माहिती समोर येत आहे .यासंदर्भात पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन दखल घेत नसल्याची खंत व्यक्त करत बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वृक्ष प्रेमींनी केली आहे.

यासंदर्भात तक्रार करण्यासाठी पालिकेत गेल्यास अधिकारी उद्दामपणे बोलतात जेणेकरून पुन्हा नागरिक याबाबत चौकशी करण्यासाठी येऊ नयेत अश्या पद्धतीचे अधिकाऱ्यांचे वर्तन असते. तळेगाव शहरात सध्या वृक्षतोड होत आहे अशी तक्रार निसर्गप्रेमी संदीप संघवी यांनी केली.

ज्यांनी झाडे तोडली आहेत त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी वृक्षसंवर्धन समितीचे सदस्य निलेश गराडे यांनी केली आहे.

याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्रथम दर्शनी वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास येत आहे. कामाच्या ठिकाणापासून दूरवरच्या अंतरावरचीही काही झाडे तोडण्यात आली आहेत. त्याची जबाबदारी ठेकेदार घेण्यास तयार नाही.त्यामुळे झाडे कोणी तोडली त्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

येणा-या काळात बेकायदेशीर वृक्षतोडीचा छडा लावून संबंधितांवर गुन्हा दाखल होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!