तळेगावात अनधिकृत पथारी धारकांवर नगरपरिषदेची कारवाई
तळेगाव : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्त्यावरील अनाधिकृत पथारी धारकांवर नगरपरिषदेने आज कारवाई केली आहे.
मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करत ठाण मांडलेल्या पथारी धारकांमुळे वाहतुकीला अडथळा होऊन नेहमीच वाहतूक कोंडी होते. तर या पथारी धारकांकडे खरेदीसाठी थांबलेले नागरिक आणि त्यांच्या रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढते. यामुळे पायी चालणाऱ्यांना रस्त्याच्या मधून चालण्याशिवाय पर्याय राहत नाही.
या पथारी धारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती.आज नगर परिषदेमार्फत पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत अनाधिकृत पथारी धारकांवर कारवाई करण्यात आली.
स्टेशन चौक ते नगरपरिषद मार्ग, तळेगाव – चाकण रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामुळे तूर्तास तरी शहरातील काही रस्ते व चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.



