सत्ताधारी भाजप पक्षातील आपापसातील मतभेदांमुळे शहराचा विकास खुंटला – गणेश काकडे
तळेगाव : नगर परिषदेमधील सत्ताधारी भाजपच्या आपापसातील मतभेदांमुळे तळेगाव शहराचा विकास खुंटला आहे अशी टीका नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केली.
शहर सुधारणा व विकास समितीच्या वतीने नगर परिषदेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काकडे बोलत होते.
नगराध्यक्षा चित्र जगनाडे यांनी 28 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या विशेष सभेकडे त्यांच्याच पक्षातील सदस्यांनी पाठ फिरवली. यामुळे गणपूर्ती अभावी सभा रद्द करावी लागली. नगराध्यक्षा व सत्ताधारी भाजप नगरसेवक यांच्यामध्ये एक विचार नसल्याने तळेगावच्या विकासाचे विषय लांबणीवर पडल्याचे काकडे यावेळी म्हणाले.
सन 2017- 18 व 2018 – 19 ची पाणीपट्टी व घरपट्टीची बिले वाटप न केल्यामुळे नागरिकांना व्याज व दंड भरावा लागेल. नागरिकांनी हा दंड का भरावा? असा प्रश्न करत दंडाची रक्कम नगराध्यक्षांनी द्यावी अशी मागणी शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी केली.
या पत्रकार परिषदेला शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे उपस्थित होते.



