मिळकत कराच्या वसुलीसाठी नगरपरिषद तोडणार नळ कनेक्शन…..
३१ मार्च २०२३ पूर्वी होणेसाठी नगरपरिषदेने पिण्याचा पाण्याचा पुरवठा खंडित करण्याचे धोरण आखले असल्याचे मुख्याधिकारी सरनाईक यांनी सांगितले.
मिळकत कराच्या वसुलीसाठी नगरपरिषद तोडणार नळ कनेक्शन…..Municipal council will cut tap connection for income tax collection.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर ३ मार्च.


नगरपरिषदेचे मालमत्ता कराचे मोठे थकबाकीदार यांना जप्ती वॅारंट बजावलेनंतरही कराची थकीत रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करणेची प्रक्रिया दिनांक.१२ डिसेंबर २०२३ पासून नगरपरिषदेमार्फत सुरु करण्यात आलेली होती.
याअंतर्गतच नगरपरिषदेने आता मिळकत कराची दहा हजार रुपयापेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या कराची वसुली ३१ मार्च २०२३ पूर्वी होणेसाठी नगरपरिषदेने पिण्याचा पाण्याचा पुरवठा खंडित करण्याचे धोरण आखले असल्याचे मुख्याधिकारी सरनाईक यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या मालमत्ता कराचे मोठे थकबाकीदार यांचेकडून थकीत कराची रक्कम वसूल करणेसाठी नगरपरिषदेने डिसेंबर २०२२ पासूनच जप्ती वॅारंट बजाविणे व अवधी उलटूनही थकीत रक्कम न भरणाऱ्यांच्या मिळकती अटकावून ठेवण्याची प्रक्रिया सुरु केली होती.याचा पुढचा टप्पा म्हणून आता नगरपरिषदेने दहा हजार रुपयापेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या मिळकतींनाही जप्ती वॅारंट बजावणे सुरु केले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ अखेर एकूण ११०० जप्ती वॅारंट बजावून, त्यामधून नगरपरिषदेने थकीत रकमेपैकी एकूण २ कोटी ४० लाखांची थकीत रक्कम वसूल केली आहे.
सन २०२२-२३ अखेरपर्यंत मिळकत कराचे १००%वसुलीचे उद्दिष्ट गाठणेच्या दृष्टीने आता शेवटच्या मार्च महिन्यामध्ये कंबर कसली असून थकबाकीदारांचे पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन खंडित करण्याचे धोरण आखले आहे.यासाठी दिनांक.१ मार्च २०२३ पासून नगरपरिषदेने मिळकत करवसुली व नळ कनेक्शन तोडण्यासाठी एकूण ६ पथक नेमले आहेत. यामध्ये विविध विभागाचे विभागप्रमुख,संबंधित वॅार्डचे करलिपिक व नळकनेक्शन तोडणारे कर्मचारी असा ताफाच दैनंदिन वसुलीसाठी व थकबाकीदारांवर कार्यवाहीसाठी शहरातून फिरणार असलेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे थकबाकीदारांनी त्वरीत आपल्या थकीत तसेच चालू वर्षाच्या मिळकत कराची व पाणीपट्टीची रक्कम नगरपरिषदेमध्ये भरणा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.
तसेच नागरिकांच्या सोयीकरिता व सुट्टीच्या दिवशीही मिळकत कर व पाणीपट्टी भरता येण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार नगरपरिषदेचे भरणा केंद्र सुरु केले आहे. नगरपरिषदेच्या भरणा केंद्रावर रोखीने, चेकद्वारे,UPI स्कॅनर द्वारे, talegaondabhademc.org – ऑनलाइन सेवा –आपले मालमत्ता देयके पहा आणि भरा ,याप्रकारे घरबसल्या ऑनलाइन कराची रक्कम भरण्याची सोय नागरिकांना उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, आणि कराची रक्कम त्वरित भरावी,असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.



