कामशेतमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य
कामशेत : कामशेतमधून नाणे मावळकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. नाणे मावळ मधील नागरिकांकडून खड्डयांसंबंधी वारंवार तक्रार करून देखील स्थानिक प्रशासनाचे ह्याकडे दुर्लक्ष होत आहे.
कामशेत मधून नाणे मावळ मध्ये जाण्यासाठी रेल्वे गेट आहे. रेल्वे गेट जवळ रेल्वेचे काम करण्यासाठी रेल्वेकडून रस्ता खोदला गेला. परंतु काम पूर्ण होऊन आता बरेच महिने उलटून देखील संबंधित खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
“कामशेतमध्ये अश्याप्रकारचे अनेक खड्डे आहेत. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून आम्हाला या खड्ड्यांमुळे आता शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.” अशी प्रतिक्रिया कामशेत मधील सामाजिक कार्यकर्ते मनोज जगताप यांनी दिली आहे.



