ताज्या घडामोडी
मतपेट्यांच्या सुरक्षेचा खेळखंडोबा! नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी करत फायर गाडी अन्य कामासाठी हलविल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला.
अंबाजोगाई | प्रतिनिधी अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकांचे मतदान झाल्यानंतर मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी 24 तास अग्निशामक दलाची गाडी तैनात ठेवण्याचे स्पष्ट नियम आहेत. मात्र, या नियमांना धाब्यावर बसवत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी करत फायर गाडी अन्य कामासाठी हलविल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. आज रविवार, सकाळी 10.35 वाजता, मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली फायर घंटागाडी प्रत्यक्ष मतदान पेट्यांच्या परिसरातून हलवून नगर परिषदेच्या 17 नंबर ठिकाणी झाडाला पाणी टाकण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट दिसून आले. आश्चर्य म्हणजे, झाडांना पाणी टाकण्यासाठी नगरपालिकेकडे स्वतंत्र पाण्याचा टँकर उपलब्ध असूनही, मतपेट्यांची सुरक्षा भंग करून घंटागाडी बाहेर नेण्यात आली. नियमांनुसार ही गाडी मतपेटीजवळून हलविणे प्रतिबंधित असून, तरीही कोणाच्या आदेशावरून ही गाडी सुरक्षा क्षेत्र सोडून गेली? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सिओ मॅडम यांनी या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन, गाडी नेमकी कुठे व कोणाच्या सांगण्यावरून नेण्यात आली याचा खुलासा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मतपेट्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.




