ताज्या घडामोडी
छत्री गेली उडत, अंबाजोगाईकरांना पापा मोदींच्या ‘कपबशी’त चहा प्यायचा आहे – बाबुराव पोटभरे अल्पसंख्यांक मुस्लिम, दलित समुदायाने पापा मोदींना साथ द्यावी – पोटभरे यांचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, समाजवादी पार्टी, रिपाइं आठवले गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाइं गवई गट, युवा आंदोलन, बेटी बचाव अभियान तसेच विविध मित्र पक्ष आणि संघटना पुरस्कृत लोक विकास महाआघाडीच्या नगराध्यक्ष तसेच शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार, दि.३० नोव्हेंबर रोजी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला लालनगर, क्रांतीनगर परिसरातील प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेसाठी अल्पसंख्यांक मुस्लिम, दलित समुदायासह सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत सुंदर व दिमाखदार नियोजनामुळे हि कॉर्नर सभा लोक विकास महाआघाडीचा विजय निश्चित करणारी ठरली आहे. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे तर व्यासपीठावर लोक विकास महाआघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी तसेच शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवार सौ.ज्योती विशाल पोटभरे, नजीर (मुन्ना) पठाण यांच्यासह डॉ.राजेश इंगोले, विशाल विजयकुमारजी जाजू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुनिल जगताप, विशाल पोटभरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्टार प्रचारक डॉ.राजेश इंगोले, सुनिल जगताप यांची समायोचित भाषणे झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना बाबुरावजी पोटभरे यांनी सांगितले की, पापा मोदी हे शब्दाचे पक्के नेते आहेत. मोदींनी जाहीरनाम्यातून अंबाजोगाईच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन आपणांस दिले आहे. तसेच नगरपालिकेत सत्तेत आल्यावर निधी कमी पडू देणार नाही असा शब्द ही त्यांनी आपणांस दिला आहे. तेव्हा या प्रभागातील दलित, मुस्लिम समुदायाने कोणाच्या ही भुलथापांना बळी न पडता पापा मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. कारण, पापा मोदी यांनी लोक विकास महाआघाडीच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्यांक मुस्लिम, दलित समुदाय व सर्वधर्मिय समाज बांधवांसाठी विविध विकास कामे पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. मागील ३० वर्षांपासून मोदींवर जनतेचा विश्वास आहे. अंबाजोगाईची जनता त्यांना आशीर्वाद देत आहे. मागील चार वर्षांत प्रशासकाच्या माध्यमातून काम करणाऱ्या व आता उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा असलेल्यांनी काहीच विकास केला नाही. हे आपण पाहिले आहे. 'लबाड लांडगा ढोंग करतोय, मत मांडायचे सोंग करतोय' अशा शेलक्या शब्दांत पोटभरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. क्रांतीनगर व लालनगर या भागाला आम्ही नांव दिले. व अनेकांचे पुनर्वसन केले आहे. विरोधकांना 'कमळावर' नगरपालिका निवडणूक लढविता येत नव्हती. कारण, त्यांना दलित व मुस्लीम समुदायाची मते मिळाली नसती. म्हणून ते आघाडी करून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी छत्री हे चिन्ह घेतले आहे. छत्रीच्या आड कमळ लपवले आहे. आपले मित्र 'कपबशी' वाले पापा मोदी हे आहेत. छत्रीवाले एन.आर.सी रद्द करण्याची भुमिका घेवू शकतात का..? हे त्यांनी आधी जाहीर करावे. मगच मुस्लिमांना मते मागावित, हा देश कोणा ही एका धर्माचा नाही. तर तो सर्वधर्मिय समाज बांधवांचा आहे. भाजपाने नेहमीच हिंदू - मुस्लिम करून निवडणूका जिंकल्या आहेत. यापुढे आपण असे होवू द्यायचे नाही. मुस्लिम समाजाने या देशासाठी आपले बलिदान दिलेले आहे. दलित - मुस्लिमांवर अत्याचार होत असताना छत्रीवाले कुठे होते..? असा सवाल करून मस्साजोगचे सरपंच मयत संतोष भैय्या देशमुख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हे त्यावेळी का गेले नाहीत. जे देशमुखांकडे जावू शकत नाहीत. ते दलित-मुस्लिम संकटात, अडचणीत असताना आपल्याकडे काय येतील. त्यामुळे आता हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात कोण छत्री वापरतो का..? आपल्याला आता थंडी जाणवत आहे. म्हणून छत्री गेली उडत. आम्हाला व तुम्हाला आता पापा मोदींच्या 'कपबशी'त चहा प्यायचा आहे. कारण, पापा मोदी हे खमके आहेत. तेच छत्रीवाल्यालाशी निवडणुकीत लढत देवू शकतात. तेव्हा दलित-मुस्लिम समुदायाने पापा मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. पापा मोदी व आपले नाते हे जीवाभावाचे आहे. विरोधकांकडे जमणारी गर्दी व होणारे प्रवेश हे कशामुळे होत आहेत हे अंबाजोगाईकरांना चांगले माहीत आहे. पापा मोदी हे संयमी, शांत व्यक्ती आहेत. तर समोरचे कसे आहेत हे आपणांस चांगलेच माहीत आहे. मोदी हे अंबाजोगाईकरांच्या विकासासाठी सातत्याने काम करीत आहेत. पापा मोदी हा गोरगरीब, दलित, मुस्लिम समुदायाच्या मदतीसाठी, सहकार्यासाठी धावून येणारा माणूस आहे. तेव्हा अंबाजोगाईतील दलित, मुस्लिम समुदायासह सर्वधर्मीय समाज बांधवांनी लोक विकास महाआघाडीच्या 'कपबशी'ला मतदान करण्याचे आवाहन बाबुराव पोटभरे यांनी केले. यावेळी पापा मोदी यांनी आपले विचार व्यक्त केले. जाहीर कॉर्नर सभेसाठी अंबाजोगाई शहरातील विविध प्रभागातून ज्येष्ठ नागरिक, युवक, महीला व लोकविकास महाआघाडीचे सर्व मित्र पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उत्स्फूर्तपणे घोषणा देत सभास्थळी पोहोचले. सभेचे सुञसंचालन विशाल पोटभरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार नजीर (मुन्ना) पठाण यांनी मानले.




