ताज्या घडामोडी

श्री होळेश्वर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगत जाणीवजागृती

होळ (ता. केज) येथील श्री होळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारत देशाचे संविधान स्वीकारण्यात आलेल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, त्यांना आपल्या मूलभूत अधिकारांची व कर्तव्यांची स्पष्ट जाणीव व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट अजमेर शेख यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या प्रक्रियेमधील अमूल्य सहभाग, संविधानाचे मूल्य, लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. संविधानामुळेच प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय मिळतो, तसेच संविधानाचे पालन करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. देवानंद संभाजीराव मलदोडे हे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून, “संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशाच्या प्रत्येक नागरिकाचे जीवन घडवणारे मार्गदर्शक तत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी लहान वयातच संविधानातील मूल्ये आत्मसात करावीत,” असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. विश्वेकर मॅडम, तसेच प्राध्यापक भैय्यासाहेब सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संविधानाविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ढवारे सर यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले, तर कार्यक्रमाचा समारोप राठोड सर यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविका वाचन, देशभक्तीपर गीत तसेच संविधानावर आधारित विचार मांडून कार्यक्रम अधिकच रंगतदार केला. संपूर्ण विद्यालय परिसरात “जय संविधान”, “जय हिंद” अशा घोषणांनी देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदरभाव निर्माण होऊन नागरिक म्हणून आपली कर्तव्ये समजून घेण्याची सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!