ताज्या घडामोडी
*लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळला* *नंदकिशोर मुंदडा यांनी राजकिशोर मोदी यांच्या नामनिर्देशन अर्जावर घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला*
अंबाजोगाई ( प्रतिनिधी ): - लोकविकास महा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर कांताप्रसाद मोदी यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधी उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी घेतलेल्या आक्षेपाचे खंडन करून तो आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला . मंगळवार दि १८ रोजी नामनिर्देशन अर्जाच्या पडताळणी मध्ये कोणताही दोष किंवा त्रुटी आढळुन न आल्याने राजकिशोर मोदी यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज वैध ठरला गेला. नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्या पासूनच लोकविकास महा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांना कोंडीत पकडण्यासाठी वारंवार साम, दाम, दंड ,भेद असे सर्व प्रकार विरोधकांनी वापरून रडीचा डाव सुरू केला आहे.राजकिशोर मोदी यांच्या सहकार्यांना विविध आमिषे , दडपशाही ,धमक्या देऊन त्यांचे भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश घडवून आणले. तरी सुद्धा जनतेच्या मनातील राजकिशोर मोदी यांच्या बद्दलची आपुलकीची भावना कमी होत नसल्याने विरोधक बिथरून गेल्याचे दिसून येत आहेत. एवढे करूनही राजकिशोर मोदी हे कुठेच व कशातच कात्रीत सापडत नसल्याचे लक्षात येताच त्यांना आता कागदपत्रांत कोठे गाठता येते का? आणि काहीपण करून मोदी यांना निवडणुकीतून बेदखल करता येते का? यासाठीचे प्रयत्न भारतीय जनता पक्ष तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांच्याकडून केल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवार दि १८ रोजी अर्ज पडताळणीची प्रक्रिया पार पडली.यामध्ये राजकिशोर मोदी यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात क्रमांक पाचच्या रकान्यात जातीचा उल्लेख केल्याचा किरकोळ व तोंडी आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी घेतला. पण अंबाजोगाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने दाखल केलेल्या अर्जात जातीचा उल्लेख केला किंवा नाही केला तरी फरक पडत नाही असे निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी स्पष्ट करत मुंदडा यांनी घेतलेला आक्षेप साफ फेटाळून लावला. याउपर सुद्धा आक्षेप घ्यायचा असेलच तर लेखी स्वरूपात आपला आक्षेप घ्यावा असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. पण आक्षेप घेण्याची मुदत संपेपर्यंत विरोधकांकडून कसलाच लेखी आक्षेप आला नाही. याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राजकिशोर मोदी यांनी विरोधकांनी रडीचा डाव न खेळता नैतिक मार्गांचा अवलंब करून निवडणूक लढवावी असे आवाहन त्यांनी केले. आजपर्यंत त्यांनी माझ्यावर अनेक बिनबुडाचे आरोप केले, पण एकसुद्धा आरोप ते सिद्ध करू शकले नसल्याचे मोदी यांनी सांगितले. विरोधकांच्या दडपशाहीला , आर्थिक आमिषाला आणि खोट्या प्रचाराला अंबाजोगाई ची सुजाण जनता बळी पडणार नाही हे निकालातुनच दिसून येईल असा ठाम विश्वास देखील राजकिशोर मोदी यांनी यावेळी बोलून दाखवला.




