आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंबाजोगाईत रिक्षाचालकांचा मनमानी कारभार; आरटीओ आणि ट्रॅफिक पोलिसांचे दुर्लक्ष?

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरात तीन चाकी रिक्षाचालकांकडून नियमबाह्य आणि मनमानी कारभार सुरू असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे. शहराजवळ आरटीओ कार्यालय असतानाही रिक्षाचालकांकडून शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. शहरातील बहुतांश रिक्षांमध्ये साईड ग्लास नाहीत, काहींना इंडिकेटर नसल्याचे दिसून येते, तर काही रिक्षांची परवाना मुदत (पासिंग) संपलेली असूनही त्या रस्त्यावर धावत आहेत. अनेक रिक्षा चालकांकडे ना युनिफॉर्म आहे ना परिवहन विभागाचा अधिकृत बिल्ला. विशेष म्हणजे काही रिक्षा तर नंबर प्लेटशिवाय रस्त्यांवर धावत आहेत, हे सर्व सामान्य जनतेला दिसत असताना आरटीओ अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या नजरेस हे कसे येत नाही, हा प्रश्न आता शहरवासीयांना सतावत आहे. अनेकदा वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना युनिफॉर्म घालण्यास आणि बिल्ला लावण्यास सूचना दिल्या आहेत. मात्र, त्या सूचना रिक्षाचालक सर्रासपणे दुर्लक्षित करताना दिसत आहेत. शहरातील मुख्य ठिकाणे जसे की बस स्टँड चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोरेवाडी पाण्याची टाकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र या ठिकाणी सिग्नल व्यवस्था नाही. नुकतेच शहरातील रस्ते दुरुस्त झाले असून त्यामुळे रिक्षांचे वेग अधिक वाढले आहेत. अशा बेशिस्त चालकांमुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या रिक्षाचालकांवर कारवाई का होत नाही? आरटीओ आणि ट्रॅफिक पोलिसांकडून ही अनास्था का? असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. आता तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिस्तप्रिय रिक्षा व्यवहारासाठी ठोस पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!