आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
गायरान जमिनीच्या हक्कासाठी राज्यस्तरीय परिषद; आदित्य ग्रीनचा प्रकल्प रद्द करण्याचा ठराव
अंबाजोगाई (जवळगाव) – गायरान जमिनीवरील हक्क आणि स्थानिक रहिवाशांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी जवळगाव येथे राज्यस्तरीय गायरान हक्क परिषद पार पडली. या परिषदेत गायरान जमिनीवरील सौरऊर्जा प्रकल्प हटवावा तसेच गायरान जमिनीवर घरकुल योजना राबवावी, असे महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी युवा आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके होते. तसेच भीमशक्ती चे धीमंत राष्ट्रपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. गायरान जमिनीवरील प्रकल्प हटवण्याचा ठराव गायरान हक्क परिषदेने एकमुखाने 211गट क्रमांकातील आदित्य ग्रीन कंपनीचा सौरऊर्जा प्रकल्प तत्काळ रद्द करण्यात यावा, असा ठराव घेतला. हा प्रकल्प स्थानिक गायरान धारकांसाठी अडथळा ठरत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच गायरान जमिनीवर गावकऱ्यांचा हक्क अबाधित राहावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायतीचा गायरान धारकांना पाठिंबा परिषदेत जवळगाव ग्रामपंचायतीने गायरान धारकांना पाठिंबा दिल्याचा ठरावही घेण्यात आला. जवळगाव ग्रामपंचायत सरपंच भगवान रावसाहेब हरे यांनी गावकऱ्यांच्या बहुमताच्या निर्णयानुसार गायरान धारकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे. गायरान जमिनीवर घरकुल योजना राबविण्याचा ठराव परिषदेत गायरान जमिनीवर घरकुल योजना राबविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गावातील गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी उपस्थितांनी केली. परिषदेतील मान्यवर आणि संघटनांची उपस्थिती या परिषदेतील प्रमुख मान्यवरांमध्ये पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ हरे, मच्छीमार सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उत्तम सखाराम हरे, मानवी हक्क अभियान तालुका अध्यक्ष वसंत उदार, माजी समाजकल्याण सभापती गया ताई आव्हाड, लाल पँथर संघटनेचे अध्यक्ष बजरंग ताटे धाराशिव , वंचित हक्क आंदोलनाचे अध्यक्ष नागनाथ चव्हाण आणि कॉ. बब्रुवाल पोटभरे जातिअंत संघर्ष समितीचे निमंत्रक धर्म मिसाळ यांचा समावेश होता. याशिवाय मराठवाडा अध्यक्ष बालाजी शिंदे, प्रसिद्ध प्रमुख विष्णू आचार्य, जिल्हाध्यक्ष माधव शिरसाठ, बीड अध्यक्ष राहुल गंडले, ज्येष्ठ साहित्यिक श्रावण क्षीरसागर, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष दशरथ सोनवणे आणि विचारवंत भगीरथ कोरडे यांनीही परिषदेला हजेरी लावली. गायरान जमिनीवर गावकऱ्यांचा हक्क प्रस्थापित करण्याचा निर्धार परिषदेत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गायरान जमिनी स्थानिकांना न देता, ती दलाल आणि मोठ्या उद्योगपतींच्या ताब्यात जात आहेत, असा आरोप करण्यात आला. या षडयंत्राला आळा घालण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय गायरान हक्क परिषदेचे आयोजक हनुमंत गायकवाड, भीमशक्ती धिमंत राष्ट्रपाल, युवा आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश जोगदंड (अंबाजोगाई) आणि नकेश कांबळे (परळी) यांनी आपले विचार मांडले. गायरान हक्क संघर्षाला गती देण्याचा निर्धार या परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील गायरान धारकांना एकत्र आणण्याचे आणि त्यांच्या हक्कांसाठी शासन दरबारी लढा उभारण्याचे ठरले आहे. गावकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत औद्योगिक प्रकल्पांसाठी जाणार नाहीत, असा निर्धार या परिषदेत करण्यात आला. — भरारी न्यूज




