आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
एसआरटी रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह: नो पार्किंगमध्ये गाडी उभी, रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यास मनाई का?
भरारी न्युज.अंबाजोगाई अंबाजोगाई येथील एसआरटी रुग्णालयात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या बाहेर पायऱ्यांवर बसलेल्या महिलांना सुरक्षा रक्षकांनी जबरदस्तीने उठवून लावल्याचे दिसून आले आहे. मात्र, याच परिसरात नो पार्किंग बोर्डासमोर उभी असलेली गाडी (क्रमांक MH-44-W-0301) कोणाच्या लक्षात न आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी उभी राहिल्यास दंडात्मक कारवाईची आवश्यकता असते. तरीही संबंधित रुग्णालय व्यवस्थापन आणि सुरक्षा रक्षकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. दुसरीकडे, रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसलेल्या महिलांना हटवणे योग्य आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयाच्या मोकळ्या परिसरात वाहनतळासाठी परवानगी आहे, परंतु रुग्णांचे नातेवाईक थोडा वेळ बसण्यासही परवानगी नसल्याचे चित्र नागरिकांसमोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे, संबंधित गाडी नो पार्किंग बोर्डाखाली उभी असल्याचे दिसून आले असताना, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे, पायऱ्यांवर बसलेल्या महिलांना हटवणारे कर्मचारी वार्ड क्रमांक १ मधील असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांना गाडी दिसली नाही, मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना हटवण्यासाठी तत्परता दाखवली गेली. सर्वसामान्य नागरिकांना असा प्रश्न पडतो की, नियम फक्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच लागू होतात का? गाड्या उभ्या करणाऱ्या व्यक्तींवर कोणतीही कारवाई का केली जात नाही? रुग्णालय व्यवस्थापनाने याबाबत तत्काळ उत्तर देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांची अपेक्षा: रुग्णालय हे केवळ उपचारासाठीच नव्हे, तर रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही सहकार्याचे ठिकाण असावे. नियम सर्वांसाठी सारखे असावे, अन्यथा रुग्णालय व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होतील. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे.




