आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*रोटरी इंटरनॅशनलच्या टीमचे शस्त्रक्रिया शिबिरासाठी काश्मीरला प्रयाण*.

Spread the love

नांदेड:(सखाराम कुलकर्णी) रोटरी इंटरनॅशनलच्या शल्यचिकित्सक, बधिरीकरणतज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ञ,दंतवैद्य आणि स्वयंसेवक अशा ३५ जणांची टीम ३ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग, पुलवामा,शोपीयान आणि कुलगाम या ठिकाणी विविध प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणार आहे. या शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन काश्मीर सरकार आणि रोटरी इंटरनॅशनलने संयुक्तपणे केले आहे. काश्मीरचे महामहीम लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या शिबिरासाठी रोटरीला निमंत्रित केले आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब मधील वर नमूद केल्याप्रमाणे सर्व तज्ञ वैद्यकीय तज्ञ सहभागी होत आहेत. संपूर्ण शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी माजी प्रांतपाल डॉ राजीव प्रधान,सोलापूर, डॉ गिरीश गुणे,पनवेल यांच्या कडे आहे.नांदेडमधील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ देवेंद्र पालीवाल, रोटरी क्लब नांदेडचे माजी अध्यक्ष, संचालक,यशोसाई हॉस्पिटल, ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ श्रीकांत लव्हेकर आणि ज्येष्ठ बधिरीकरणतज्ञ डॉ करुणा पाटील हंगरगेकर, रोटरी क्लब नंदीग्राम नांदेडच्या संस्थापक अध्यक्ष,माजी वैद्यकीय अधीक्षक स्त्री रुग्णालय, नांदेड सहभागी होत आहेत. शिबिरासाठी काश्मीर सरकार तर्फे शस्त्रक्रियेची गरज असणार्या रुग्णांचे सर्वेक्षण आणि पूर्व तपासणी झालेली असून १५०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये गुंतागुंतीच्या तसेच मोठ्या शस्त्रक्रिया होणार असून किडनी,गॉल ब्लॅडर, अस्थिरोग, कान-नाक-घसा, मोतीबिंदू, प्लास्टिक सर्जरी,स्त्री रोगांवरील आणि लहान मुलांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. काश्मीर सरकारने या शिबिरासाठी सर्व रुग्णालयांमध्ये अतिरिक्त स्टाफ, डॉक्टर्स तसेच ज्यादा शस्त्रक्रियागृहांचे (ऑपरेशन थिएटर) नियोजन केले आहे. भारताच्या एकात्मतेसाठी आणि काश्मीरला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक नवा संदेश या शिबिरामार्फत जनतेला दिला जाणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, कुपवाडा,गंधरबाल या जिल्ह्यांमध्ये असेच रोटरी इंटरनॅशनलचे शिबीर डॉ राजीव प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात अवघ्या ९ दिवसांत २४९९ शस्त्रक्रिया पार पडल्याने एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.या शिबिरातील झालेल्या शस्त्रक्रियांमुळे प्रभावित होऊन राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेत शिबिराचे आयोजन करण्याचा मान रोटरीला दिला आहे. रोटरी इंटरनॅशनलतर्फे गेल्या २५ वर्षांत भारतात उदगीर,जि.लातूर, जालना आणि उधमपूर तसेच आफ्रिकेतील १८ देशांमध्ये डॉ प्रधान यांच्या यशस्वी आयोजनातून ४६ शिबिरे पार पडली आहेत. या शिबिरामध्ये एक लाखांहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या असून, आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये भारताचे नाव ” मदत करणारा देश” म्हणून अधोरेखित झाले आहे. यंदाच्या शिबिरात देखील अशीच चांगली कामगिरी करण्याचे ध्येय रोटरीच्या टीमने बाळगले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!