आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बडतर्फ काळातील एका मुख्याध्यापकला १६ लाख रुपये वेतन देऊन नांदेडच्या पेयूनीट ने शासनाला गंडवले. यात शिक्षणाधिकारी पण सहभागी?*

Spread the love

नांदेड -(आमचे विशेष प्रतिनिधी सखाराम कुलकर्णी याज कडून)  कै. लक्ष्मणराव पाटील हसेकर माध्यमिक विद्यालय लगळूद ता.भोकर जि.नांदेड चे मुख्याध्यापक कदम ए.जे. हे ११ महिने बडतर्फ असतांना ही अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या संगनमताने त्यांना १६ लाख रुपये वेतन देऊन शासनास गंडवले.जिल्ह्यात असे अनेक प्रकार आहेत. त्याची चौकशी करून अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांचे वर अपहार केल्याचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी सचिव वित्त विभाग व सचिव शालेय शिक्षण विभाग मुंबई यांचे कडे केली.

वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक नांदेड येथे गैर कारभाराने कळस गाठला असून शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने गैर मान्यता दिलेल्या शिक्षकांची कोट्यावधी रुपयाची थकित बिल गैर प्रकारे देऊन शासनाला कोट्यावधीला गंडवले जात आहे.

*ते असे की*
१) कदम ए. जे. हे कै. लक्ष्मणराव पाटील हसेकर माध्यमिक विद्यालय लगळूद ता. भोकर जि. नांदेड या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते .पण दि.२८-१०-२०२० रोजी संस्थेने त्यांची सेवा समाप्त केली होती. त्यानंतर शाळा न्यायाधीकरण लातूर यांच्या आदेशान्वये कदम ए.जे. यांना दि.२४-११-२०२१ रोजीच्या न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांनी पत्र जा.क्र./जिपना/शिविमा-८/490/2021-22 दि. ३१ जानेवारी २०२२ ला रोजी करून घेण्याचे आदेश संस्था अध्यक्षांना दिले व या आदेशात नमूद केले की दि. २८-१०-२०२० पासून दि.३०-११-२०२१ पर्यंत कदम ए. जे. यांना बडतर्फ केले होते म्हणून या कालावधीत कदम कर्तव्यावर उपस्थित नसल्यामुळे त्यांना या काळातील वेतन व भत्ते देता येत नाहीत .असे आदेश असतानाही मुख्याध्यापक कदम यांनी अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक नांदेड येथे ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ पर्यंतचे १६ लाख ५८ हजार ८३७ रुपये चे वेतन बिल दाखल केले.व अधीक्षक वेतन पथकाने बिल घेतले. अधीक्षक वेतन पथक नांदेड यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांचेशी संगणमत करून कोणताही विलंब न करता हे बिल आदा केले. इतक्या मोठ्या रकमेच्या बिलास अदा करण्यासाठी मा. शिक्षण संचालक पुणे यांची मंजुरी घ्यावी लागते. पण अधीक्षक वेतन पथक यांनी कोणतीही मंजुरी न घेता या काळातील सदरील वेतन अदा करायचे नाही असे असतानाही सदरील बिल अदा करून शासनास गंडवले. ही रक्कम कोणाच्या खात्यातून घेतली हे गोड बंगाल आहे. या गंभीर बाबीची चौकशी व्हावी.
२) कै. लक्ष्मणराव पाटील हसेकर माध्यमिक विद्यालय लगळुद ता. भोकर जि. नांदेड याच शाळेतील श्रीमती चव्हाण मॅडम यांचे तीन वर्षाचे 30 लाख रुपयाचे थकीत वेतन कोणाचीही परवानगी न घेता व वादात असताना अधीक्षक वेतन पथक नांदेड व शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांनी अदा करून तीस लाखाला शासनाला गंडवले आहे.
३) संजय गांधी विद्यालय पुणेगाव ता. नांदेड या शाळेतील श्री हंबर्डे व श्री सोनटक्के सहशिक्षक हे शाळेत गैरहजर असताना व वादग्रस्त प्रकरणात असताना यांचे सोळा वर्षाचे वेतन दोन कोटीच्या वर असलेली रक्कम नियमबाह्यपणे अधीक्षक वेतन पथक नांदेड व माध्यमिक शिक्षणाधिकारी नांदेड यांनी संगणमत करून मार्च २०२२ ला अदा करून शासनास गंडवले.
४) झाकीर हुसेन उर्दू शाळा मुखेड बंद झाल्यावर या शाळेतील मुख्याध्यापकांना अंधारात ठेवून चार शिक्षकांचे वेतन मंजूर केले ते भारतीय स्टेट बँकेत दाखल केल्यावर मुख्याध्यापकांच्या पत्राशिवाय बँकेच्या व्यवस्थापकांनी अदा केले नसल्यामुळे कित्येक दिवस ही रक्कम बँकेतच पडून होती व याचा दंड शासनाला पडला. असे काही गैर कारभार अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक नांदेड व शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड करत आहेत. व शासनाची फसवणूक करून शासनाला कोट्यावधीला गंडवून वैयक्तिक लाभ घेत आहेत. या कार्यालयाची सखोल चौकशी केली तर कोट्यावधीचे बोगस बिल व थकबाकीची बिल अदा करून शासनाला कसे गंडवले जाते हे उजेडात येईल.
शासनाची जास्त फसवणूक होऊ नये म्हणून नांदेडच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय व शिक्षण विभाग नांदेड यांची उच्चस्तरीय विभागाच्या बाहेरील लेखापरीक्षण अधिकाऱ्याकडून चौकशी करावी व दोषींवर गुन्हे दाखल करावेत. मात्र शिक्षण उपसंचालक लातूर व लेखा परीक्षण कार्यालय नांदेड यांचे कडे ही चौकशी देऊ नये. असे निवेदनात नमूद करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!