आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून; मुलीच्या भावासह मित्राने काढला काटा
अंबाजोगाई येथील पोखरी रोडवर एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या मुलीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार, पोखरी रोडवरील वृंदावन हॉटेलजवळ बसले असताना राजकुमार कर्डे (वय २६) यांच्यावर कोयता आणि लाठ्या-काठ्यांनी वार करून गंभीर जखमी करण्यात आले. या हल्ल्यात त्यांना छाती, पोट, पाठ आणि चेहऱ्यावर गंभीर मार लागला. स्थानिकांनी तातडीने त्यांना स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात मृताच्या आई केशरबाई साहेबराव कर्डे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, राजकुमार कर्डे यांचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, दोघे वेगवेगळ्या जातीतले असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केला होता. या विरोधातूनच मुलीचा भाऊ वैजनाथ शिंदे, त्याचा मित्र वेंदात वैजनाथ शिंदे आणि अजिनाथ भांडे यांनी कट रचून राजकुमार कर्डे यांचा खून केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी अंबाजोगाई पोलीस कसून तपास करत आहेत. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने कार्यरत झाले आहे. लवकरच आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.




