वृद्धाश्रम : एक समाजाला लागलेली कीड? प्रफुल्ल ओव्हाळ.
नाना पाटेकर एके ठिकाणी म्हणतात की मी अजून एवढा मोठा नाही झालो की आईला सोबत ठेवायला तर मीच आई जवळ राहतो, हा नम्रपणा आपल्यात ही आला तर किती बरं होईल ना....
वृद्धाश्रम : एक समाजाला लागलेली कीड?
प्रफुल्ल ओव्हाळ.
आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी, ३ डिसेंबर.

नुकतीच मावळातील कामशेत जवळील एका वृद्धाश्रमला भेट दिली.आश्रमात प्रवेश केल्यावर अतिशय प्रसन्न वाटले पण ती प्रसन्नता फार काळ नाही टिकू शकली, कारण मी गाडी पार्क केली आणि सहज वरती पाहिले तर एक आजोबा गॅलरीत बसले होते मी वर पाहिले आणि सहज हात वर करून नमस्कार केला तर ते बोलले “हे काय खूप दिवसांनी आलात इथे”; कसा काय बरं आहे ना सगळे?त्यांना वाटले होते की मी ही माझ्या वृद्ध आई वडिलांना सोडून गेलोय आणि खूप दिवसांनी त्यांना भेटायला आलोय,मला पुरते माहिती होते की मी जर यांना भेटलो तर अनेक दुःखी आजी आजोबा की जे कोणी आपल्या मुलाला, कोणी आपल्या सुनेला, तर कोणी नातूला, तर कोणी नातीला भेटायला आतुर झालेले असतील त्यामुळे मी त्यांना अर्थात त्या वृद्धांना भेटण्याची हिम्मत केली नाही.
आयुष्यभर कष्ट करून, थकलेली, आपल्या अंतिम क्षणांची वाट पाहणाऱ्या डोळ्यांना, मरण येत नाही म्हणून आणि आपल्या बेगडी जीवनाला अजून एक बेगड लावलेल्या मुलामुलिंच्या आठवणीत रमलेल्या मनांना नाही भेटू शकलो.
शेवटी खाली असलेले व्यवस्थापाक भेटले ते निवांत पेपर वाचत बसले होते त्यांचे ही वय असेल ५० पर्यंत. म्हणतात ना ‘आधी कसे काय आणि मग बरेच काय’ तसं आमचे बोलणे सुरू झाले.थोडी माहिती घेतल्यानंतर चहा पाणी झाले ,थोड्या गप्प झाल्या आणि त्यानंतर मात्र मी त्यांना थोडा वेगळा आणि अनेक दिवसांपासून बोचत असलेला प्रश्न विचारला की ,खरंच वृद्धाश्रम असणे गरजेचे आहे का हो ?यावर त्या व्यक्तीचा खटाटोप सुरू झाला होता खरंच वृद्धाश्रम असणे खूप गरजेचे आहे नव्हे ती एक काळाची गरजच आहे,समाजाला पुढे वृद्धाश्रमशिवाय पर्यायच हे आणि बरेच काही सांगण्याचा.

अर्थात हा त्या व्यक्तीचे वैयक्तिक मत होते ज्याचा आपण सन्मान केला पाहिजे आणि तसेच तो त्यांचा व्यवसायिक तडजोड करण्यासाठीचे तयार झालेले मत होते.पण प्रश्न असा आहे खरंच वृद्धाश्रम गरजेचे आहे का?वृद्ध खरंच कुटुंबा साठी ओझे होतात का? जर समाजात वृद्धाश्रम मोठ्याप्रमाणात तयार होत गेले तर त्यामुळे काय काय समस्या निर्माण होतील,याकडे कोणी पाहणार आहेत का?कधी कधी ज्या वर्गाला आपण समाजाचा आरसा मानतो,ज्या समूहाला बघून इतर समूह जगणे शिकतो, अशा समाजाने अथवा घटकाने जर अशा प्रथा समाज सुधारण्याच्या नावाखाली करत असेल तर चौकीदारच चोर है,असे म्हणावे लागेल.
आपण ना थोडे मुद्देसुद बघू:
1.ढोबळमानाने कधीपासून निर्माण झाली असावी ही वृद्धाश्रम संस्कृती?
तर याचे उत्तर आहे जेंव्हा आपली एकत्र कुटुंब पद्धत संपुष्टात आली तेव्हा ही वृद्धाश्रम पद्धत जन्मला आली असावी.कारण अगदी अलीकडच्या काळात हे वृद्धाश्रम मोठ्याप्रमाणात निर्माण झालेत . पूर्वी एकत्र कुटुंब असल्यामुळे घरात किती जरी म्हातारी माणसे असली तरी ओझं नव्हते तर त्याकडे एक वेगळीच संपत्ती म्हणून पाहिले जायचे,’घराला घरपण आहे आमच्या हे म्हातारी म्हातारे असल्यामुळे’ असे वाक्य अनेक वेळा आपण ऐकलेही असेल.
नंतर समाजात शिक्षण खूप झाले मी त्याला अतिशिक्षण म्हणले इतके शिक्षण झाले की,आपला शिकलेला पोरगा शहरात गेला आणि मोठया पगाराच्या नोकऱ्या मिळवल्या. मग लग्न झाले ती ही नोकरीला आणि एका वेगळ्या संस्कृती मध्ये ते दोघे जगू लागले ,राहणीमान (त्यांच्या दृष्टीने) सुधारलेले नव्हें उंचावलेले.मग आपल्या गावाकडच्या आई वडिलांच्या अंगाचा त्यांना वास येऊ लागतो.आणि त्यांना आपल्या सोबत ठेवणे लाज वाटू लागले,लाखों रुपये पगार असल्यामुळे १० /१५ हजार रूपये देऊन वृद्धाश्रम मध्ये आईवडिलांना टाकणे खूप सोप्पे झाले. आणि जे पक्षी रान पाखरा सारखे मुक्त जगत होते ते पक्षी त्या आश्रमात बंदी होऊन जगू लागतात नव्हे मरू लागतात.हे झाले बेगडी जीवन जगण्याऱ्या माझ्या खेड्यातील लेकरांच्या बाबतीत.
- 2.आता जे पिढ्यानपिढ्या उच्चभ्रू जीवन जगले त्यांच्या विषयी:
या समुहाकडे भावनांना थाराच नाही असे वाटते,खूप व्यवसायिक दृष्टीकोण अगदी नात्यात सुद्धा ठेवणारी हा वर्ग इथे मी कोणती जात नाही किंवा कोणता धर्म बोलत नाही,तर ही एक सामाजिक प्रवृत्ति आहे त्याविषयी इथे मी बोलतोय, तर या so called उचभ्रू समाजाने काय केले तर ही एक प्रथाच त्यांच्यात रूढ केली मी माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकले म्हणून मी माझ्या वडिलांना तिथे टाकले, तेच माझ्या मुलांनी बघितले आणि त्यांनी ही तेच केले, ही जणू प्रथाच बनली.
इथे दोन प्रकारची प्रवृत्ति दिसतात एक तर अनुकरण करणारी,बेगडी जीवन जगणारी तर, दुसरी आपल्या आपल्या स्वार्थ प्रवृत्ती ला संस्कृती समजणारी वृत्ती.
खरंतर अशा वृद्धाश्रमाची गरज काहीच नाही जर आपण या वृत्ती ठेचून काढल्या तर किंवा या वृत्ती या प्रवृत्ती ला नष्ट केल्या तर.खरंच समाजात अगदी व्यवसाय म्हणून ही वृद्धाश्रम तयार होताना दिसत आहे.मोठ्या मोठया फी ठेऊन सेवा करण्याच्या नावाखाली मेवाच कमावतात असे म्हणावे लागेल.आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवणे म्हणजे कोणते शहाणपणाचे लक्षण आहे कारण ज्या आई ने नऊ महिने नऊ दिवस आपल्या उदरात आपल्याला सुरक्षित ठेवले, ज्या बापाने आपल्या स्वप्नांना आपल्या मुलांच्या स्वप्नात विलीन करून आपल्या स्वप्नांना मूठमाती देऊन जगले,ते आईबाप म्हातारपणात एवढे जड होतील?

या समाजातील अत्यंत विकृत आशा प्रवृत्तिला तुम्ही आम्ही कायमची संपवली पाहीजे आणि आपले आई बाप आपल्यासोबत असले पाहीजे ही वृत्ती प्रगत झाली पाहिजे.समाज कोणताही असो शेवटी आई बाप आणि त्यातील भावना सारख्याच असताना ,नाही तर आपल्या निवृत्तीनंतर ही वृध्दमंडळी त्याच क्षणी आपल्या जीवनातून ही निवृत्ति घेतली तर विशेष वाटून घेऊ नये.
शेवटी एकच सांगेल की इतके मोठे नका होऊ जिथे आपल्याला आपले आई बाप वृद्धाश्रमात ठेवावे लागेल.
नाना पाटेकर एके ठिकाणी म्हणतात की मी अजून एवढा मोठा नाही झालो की आईला सोबत ठेवायला तर मीच आई जवळ राहतो, हा नम्रपणा आपल्यात ही आला तर किती बरं होईल ना….



