जरा प्रवाशांचा, आमचा बी विचार करा कि दादा ! हर्षल विनोद आल्पे
जरा प्रवाशांचा, आमचा बी विचार करा कि दादा !
आवाज न्यूजः हर्षल विनोद आल्पे ।। 27 ऑगष्ट 
तळेगाव, लोणावळा येथून हजारो लाखो प्रवासी, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक पुण्यापर्यंत रोज प्रवास करत असतात. अगदी काही लोकल गाड्यांमध्ये तर पाय ठेवायला जागा नसते. मावळातील विकासगंगा वाढायला खरतर ही पुणे लोणावळा लोकल कारणीभूत आहे. मागील दोन वर्ष ही लोकल जराशी रखडत रखडतच चालली होती. आधी कोरोनाच्या भीतीमुळे बंदच होती. आता हळूहळू ती पूर्वपदावर येते आहे. असे वाटत्ते आहे. पण अजून ही ज्या २०२० च्या आधी ज्या समस्या, प्रवाशांना कायम भेडसावत असायच्या त्याच आता ही थोड्या फार प्रमाणात जाणवत आहेत. एक म्हणजे दुपारी १ ते ३ च्या दरम्यान या मार्गावर कुठल्याच प्रकारची लोकल वाहतूक नसणे, ही हलकी वाटत असली तरी ती हलकी निश्चितच नाही. यावेळेत अनेक प्रवासी स्थानकांवर हतबलपणे बसलेले आपण पाहिले आहेत. विचारायला गेल्यास रेल्वे खात्याकडून उद्दाम उत्तरे ही नेहमीची आहेत. रेल्वे प्रवासी संघ कायमच या गोष्टी साठी लढताना दिसतोय. पण त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश ही येताना दिसत नाही. मुळात एकेक दोनदोन तास ट्रेन च नसणे, हे खरतर आजच्या मेट्रो च्या जमान्यात खूपच तापदायक आहे. अशावेळी, जेव्हा मावळातील, पिंपरी चिंचवड मधील सगळे भाग हे वेगाने विकास करू पाहात आहेत. फक्त सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सातत्याने नियमित गरज आहे. त्या बाबतीत फारच हलगर्जीपणा करताना शासनातील काही मंडळी दिसतात. अहो ! सगळ्यांना चारचाकी गाड्या घेणे शक्य नसते हो! आमचा पण काही तरी विचार करा राव.
त्यात टोल नाक्यांवरील वाढणारी सतत गर्दी ही सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा झाल्याचेच दाखवते. लोकल ची एक बाजू जर नियमित आणि सातत्यपूर्ण केली तरी तुमचे निम्म्याहून अधिक प्रश्न सुटतील. हे लक्षात घ्यायलाच हवे.
दुपारी एक ते तीन मध्ये किमान दोन लोकल तरी चालवणे गरजेचे आहे. बर या वेळेत इतर ट्रेन्स ची गर्दी असते का ? असे म्हणावे तर जरा निरीक्षण केल्यास या वेळेत या मार्गावर एक ही बाहेरगावची ट्रेन धावताना ही दिसत नाही. मग हा मोठा ब्रेक कशासाठी ? बर मेटेनन्स साठी आवश्यक असल्यास, एवढा वेळ का ? त्या पेक्षा मुंबईतील चाललेल्या नियोजनाच्या धर्तीवर आठवड्यातील एक संपूर्ण दिवस मेगाब्लोक घेऊन ही तुम्ही उत्तम सांभाळू शकताच कि, मुंबईत आणि इतर शहरात मिनिटा मिनिटाला गाड्या असुन सुद्धा लोकल च्या बाबतीत अप्रतिम नियोजन केले जाते. मग आम्हालाच का ते जमत नाही? आम्हाला दुपारी तीन चार तास हवाय कशाला ब्रेक? हाच प्रश्न सर्व सामान्य प्रवासी विचारत असतात. पण उत्तरे मिळत नाहीत. इथे हे असेच चालते, असे काही उद्दाम अधिकारी म्हणत असतात.
यावर कारवाई व्हायला हवी, लोकल मध्ये सातत्य हवेच, पुणे लोणावळा मार्ग सुद्धा आता सगळ्याच बाबतीत महत्वाचा आहे बर का ! मोठमोठी कामे इथे सुरु आहेत. याला या बाबतीत मागासलेले ठेऊ नका . शेवटी विकासासाठी सर्वांना दळणवळणाची समान संधी सर्वांना च असायला हवी. मेट्रो काय, येईल तेव्हा येईल, पण आता जी गोष्ट तुमच्या हातात आहे ती तरी नियमित सुरु करा , हीच आमची प्रवासी म्हणून मागणी आहे. इतकेच।।



