ताज्या घडामोडी
शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक – सरिता कैशिक ABP माझा कार्यकारी संपादक.
अंबाजोगाई भरारी न्युज.– शेतकऱ्यांसाठी विविध योजना, कायदे आणि निर्णय घेतले जात असले तरी त्यांचा प्रत्यक्ष परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर कितपत होतो, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कैशिक यांनी केले. त्या शेतकरी सहवेदना कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी मराठवाडा व विदर्भातील पाणीटंचाई, सिंचनातील भ्रष्टाचार आणि अपुऱ्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर भाष्य केले. “सिंचन प्रकल्पांतील भ्रष्टाचारामुळे पाणी शेतापर्यंत पोहोचायला उशीर झाला आणि त्याची किंमत शेतकऱ्यांनी आत्महत्यांच्या रूपाने मोजली. एक रुपया भ्रष्टाचार झाला तरी त्याची शिक्षा कुणाला तरी भोगावी लागते,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांवरील कर्जाचा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित नसतो. मुलींचे लग्न, कुटुंबातील आजारपण यासाठीही कर्ज घ्यावे लागते. अशा वेळी शेतकऱ्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या परिस्थितीकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. इस्रायलसारख्या देशाने तंत्रज्ञानाच्या मदतीने खाऱ्या पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करून ८० टक्के पाणी शेतीसाठी उपलब्ध केले आहे. आपल्या देशातही अशा सकारात्मक बदलांचा अभ्यास करून ते प्रत्यक्षात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “बदल सरकारनेच करावा, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा समाज, संघटना आणि शेतकरी यांनीही पुढाकार घ्यायला हवा,” असे आवाहन त्यांनी केले. कांदा, गहू यांसारख्या पिकांच्या दरांमध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळू दिला जात नाही. उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते, याचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले. दहा रुपयांचा कांदा शेतकऱ्याला पाच रुपयांत विकावा लागतो, ही वास्तवस्थिती बदलण्यासाठी धोरणात्मक सुधारणा आवश्यक आहेत, असेही त्या म्हणाल्या. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कठोर आणि दीर्घकालीन निर्णय घ्यावे लागतील. या विषयावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी हिताचा विचार करणे ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त करून त्यांनी शेतकरी सहवेदना चळवळीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.




