निष्काम कर्मयोगी शांताबाई येवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली-
शांताबाई म्हणजे त्यावेळची 50- 55 वर्षाची एक ग्रामीण स्त्री!कपाळावर मोठ कुंकू!उन्हाने राबलेला चेहरा- सोनेरी काड्यांचा चष्मा! त्यामुळे व्यक्तिमत्त्वात नकळत आलेला भारदस्तपणा! पण तोच थोडा काहीशा चिंतेमुळे आक्रसलेला
निष्काम कर्मयोगी शांताबाई येवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली-
शांताबाई येवले—आधार रोपापासून आधार वृक्षाकडे!—मित्रांनो अल्पशा आजाराने आभाळमाया अनाथ मुलींचं वस्तीगृह मावळात चालवणाऱ्या “शांताबाईंच निधन झालं, ही बातमी कळली! पंचवीस वर्षापूर्वी घडलेली घटना माझ्या डोळ्यासमोर एखाद्या चलत चित्रपटासारखी मला दिसायला लागली! मित्रांनो– डोंगराच्या कुशीत वसलेलं मावळ तालुक्यातील पाचाणे हे गाव! गेले 40-45 वर्ष वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून माझा ग्रामीण जीवनाशी आलेला संबंध! एक दिवस या गावच्या शांताबाई येवले यांना त्यांच्या नातेवाईकांनी माझ्या हॉस्पिटलमध्ये आणलं! शांताबाई म्हणजे त्यावेळची 50- 55 वर्षाची एक ग्रामीण स्त्री!कपाळावर मोठ कुंकू!उन्हाने राबलेला चेहरा- सोनेरी काड्यांचा चष्मा! त्यामुळे व्यक्तिमत्त्वात नकळत आलेला भारदस्तपणा! पण तोच थोडा काहीशा चिंतेमुळे आक्रसलेला! त्यांची आपल्या प्रकृती विषयी तक्रार होती की मला– दम लागतो- हात पाय थरथर कापतात! रात्रभर झोप लागत नाही! अन्नावर वासना नाही! शांताबाईंच्या तक्रारीनुसार मी त्यांची पूर्ण तपासणी केली! पण मला रोग निदान होईना! कारण एक्स-रे- रक्त लघवीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल होते! तासाभराच्या प्रश्नोत्तरातून शांताबाईंच्या संदर्भातील सर्व चित्र स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर उभ राहिल!
केवळ सही करण्याइतपत अक्षरांची ओळख असणारी शांताबाई जगाच्या दृष्टीने अशिक्षित असली तरी- दूरदृष्टी असलेली सक्षम कर्तबगार गृहिणी होती! माझ्या भेटीच्या अगोदर पाचवर्ष एका दानशूर व्यक्तीच्या अर्थसहाय्यातून दहा अनाथ मुलींच संगोपन शांताबाई करीत होती! पण दुर्दैवाने त्या दानसुराचा अचानक मृत्यू झाला ! अर्थसहाय संपलं! त्यामुळेच आपल्या मायेच्या पंखाखाली वाढणाऱ्या या मुलींचं करायचं काय या चिंतेन शांताबाईंना घेरलेलं होतं! मी विचार केला की जर शांताबाईचा आजार खऱ्या अर्थाने दूर करायचा असेल तर तिला दरमहा लागणाऱ्या दहा हजाराची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला शासकीय अनुदान किंवा दानशूर व्यक्तींना भेटणं आवश्यक होतं! शांतपणे बसून कोणाला भेटावं? हा प्रश्न कसा सोडवावा? याचा विचार करता करता मी स्वतःलाच प्रश्न केला की– तू स्वतः ती मदत करू शकतो का? गेले 30 वर्षे या मावळात वैद्यकीय सेवा करतो आहे! यांच्यातूनच तुला अर्थप्राप्ती झालेली आहे! तुझ्या स्वतःच्या मुलींचे शिक्षण- लग्नकार्य वगैरे सर्व सर्व जबाबदाऱ्या तू स्वतः पार पडलेल्या आहेत! आता तुला आर्थिक दृष्ट्या कोणतीही अडचण नाही! असं असताना तू स्वतःच शांताबाईला मदतीचा हात पुढे का करीत नाही? मित्रांनो– माझ्या मनानेच मला होकारात्मक कौल दिला! ठरलं –मी शांताबाईंना माझा निर्णय कळवला! दर महिन्याला पाच तारखेला रुपये दहा हजाराचा चेक माझ्याकडून घेऊन जात जा! मला शक्य आहे तोपर्यंत शांताबाई आपण कोणत्याही पैशाची
काळजी करू नका! आपलं कार्य असंच सतत चालू ठेवा अस अभिवचन त्यांना दिलं! मित्रांनो आज त्या गोष्टीला जवळजवळ 25 वर्षे झालेली आहेत!
दरम्यानच्या काळात पत्रकारांचे लक्ष शांताबाईंच्या या निस्वार्थ सेवेकडे गेलं! त्यांनी तिची दखल घेऊन अत्यंत प्रभावीपणे वाचकांसमोर शांताबाईंच्या कार्याची महानता आपल्या लेखणीतून समाजापुढे ठेवली! साहजिकच अनेक सामाजिक संस्थांचे लक्ष शांताबाईकडे वेधलं गेल! तिला “जिजामाता पुरस्कार” मिळाला! पानिपत कार ,डॉक्टर विश्वास पाटील यांनी अत्यंत उदार अंतकरणाने एक लाख 25 हजार रुपयांची मदत शांताबाईंना केली. शांताबाईच्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त झाला! माझ्याबरोबरच– आमचे सन्मित्र लायन शैलेशभाई शहा, दरमहा दहा हजार रुपयाची मदत गेले दहा वर्ष करीत आहेत!त्याच बरोबर त्यांचे बंधू नेरे गावचे मा पोलीस पाटील, शिवाजी जाधव चिरंजीव विलास व येवले परिवार नात, काजल बोडके आणि सकाळ् वृत्तपत्राचे पत्रकार राधाकृष्ण येणारे, यांचेही विशेष योगदान मिळाले या सर्व मदतीच्या जोरावर शांताबाईंच्या आभाळमाया या संस्थेच्या 15 मुलींची संख्या आज 35, मुलींपर्यंत गेलेली आहे!त्यात, कातकरी ठाकर -विधवा परितक्त्या अशा स्त्रियांच्याअनाथ मुलींचा समावेश आहे! त्यातून काही पदवीधर झाल्यात! काही आपापल्या घरी अत्यंत सुखाने संसार करीत आहेत! मित्रांनो– मंगेश पाडगावकरांनी एकदा म्हटलं होतं–काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा कुणी नसतं! तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभ असत, असंच काहीसं काम परमेश्वराने दिलेल्या आयुष्यात शांताबाईंनी केलेल आहे! मला भेटलेली शांताबाई– ज्यांना आम्ही, मावळची सिंधुताई म्हणायचो त्या-शांताबाई माझ्या सारख्याच डॉक्टर मित्रांनाही भेटावी! अनाथांचे नाथ होण्याचं सत्कर्म त्यांच्या हातूनही घडावं, हीच खऱ्या अर्थाने शांताबाईंना दिलेली श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं!
शब्दांकन: लायन शाळीग्राम भंडारी..



