चैत्र नवरात्र उत्सवनिमित्त कार्ला येथील एकवीरा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
कार्ला : राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील श्री एकवीरा देवी मंदिरात चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

श्री क्षेत्र आई एकवीरा देवी चैत्र उत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी राज्यातून तसेच मुंबई, ठाणे, पेन, पनवेल, उरण, कर्जत, खोपोली, रायगड, अलिबाग या भागातील आगरी-कोळी समाजाचे लोक प्रामुख्याने मोठ्या संख्येने येतात. हजारो पालख्या व दिंड्या परंपरेनुसार कोकणातून कार्ल्याला पायी येतात. देवीच्या पालखी सोहळ्याला लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होते.
एकविरा माहेरघरी रंगला भैरवनाथ महाराज पालखी सोहळा
देवीचे माहेरघर देवघर येथे पारंपारिक पद्धतीने काळभैरवनाथ यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षी चैत्र षष्ठीला देवघर येथे एकवीरा देवीचा भाऊ काळभैरवनाथ पालखी सोहळा पार पडतो. कोकणातून येणाऱ्या देवीच्या पालख्या मुख्य गडावर जाण्यापूर्वी काळ भैरवनाथ मंदिरात येतात व आई एकविरा तसेच काळ भैरवनाथ यांची भेट घडवतात.




