कोजागिरीच्या चांदण्यात रंगले वानप्रस्थाश्रमातील आजी आजोबा
तळेगाव दाभाडे : खळखळता झरा ,अनुभवाचे भांडार आणि उत्तम संस्काराची शिदोरी आणि तरुणाईला लाजवेल इतका उत्साह याचे उत्तम उदाहरण म्हणजे तळेगावातील यशवंतनगर मधील वानप्रस्थाश्रमातील सर्व आजी आजोबा ,निमित्त होते कोजागिरी पोर्णिमेच्या कार्यक्रमाचे.
या कार्यक्रमात आजी आजोबांसाठी खास त्यांना सहभागी करून घेऊन विविध खेळ घेतले गेले. जसे की, संगीत खुर्ची , बादलीत बॉल टाकणे ,पासिंग दी बॉल . ह्या सर्व खेळांमध्ये सगळ्या आजी आजोबांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला .फक्त 91 वर्षांच्या सावंत आजींनी काठी टेकत टेकत संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक मिळवला.तर दूसरा क्रमांक ज्ञानेश्वर झिटे यांचा आला.तर तृतीय क्रमांक माधव पारखी यांचा, तर बादलीत बॉल टाकण्याच्या स्पर्धेत जानकी राम कोते यांचा प्रथम तर दूसरा क्रमांक अंजना शिंदे यांनी मिळवला .
पासिंग दी बॉल स्पर्धेत सर्वच आजी आजोबांनी उत्साहाने विविध गुणदर्शन घडवत आपला सहभाग नोंदवला ,यात प्रथम क्रमांक अनीता आंग्रे यांचा तर दूसरा क्रमांक श्रीयुत घोडेकर यांचा आला .
यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये श्रीमती वनकर आजी व कोते आजींनी श्रीसूक्त श्लोकाचे पठण करून वातावरण मंगलमय केले .अनुपमा मोडक यांनी अष्टविनायक यात्रा आपल्या गीतातून वातावरण मोरयामय केले. कुलकर्णी आजींनी रामनामाची दारू ह्या नृत्यातून सर्वांना रामनामाचे महत्व सांगितले.
“आपल्याला काय करायचे” ह्या नाट्यछटेतून सोसायटी मध्ये उठाठेव करणा-या मालती काकूंची धमाल भूमिका रंगवत विद्या मुळे यांनी कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर आपल्या सुरेल आवाजात भिडे काकांनी गुंडी लावते द्रौपदी हरीच्या बोटाला हे विडंबन गीत सादर केले आणि बासरी वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . त्यानंतर सहभागी आजी आजोबांनी भोंडला ही सादर केला .
ह्या स्पर्धेमध्ये विजयी होणा-यांना सुधाकर देशमुख (कार्यकारिणी सदस्य ) यांच्या व उर्मिला छाजेड यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली . दुग्धपानाने या कार्यक्रमाची सांगता झाली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री जोशी यांनी केले . तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्या मुळे व जयश्री जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.




