ताज्या घडामोडी
“अंबाजोगाईच्या रस्त्यांवर ‘अदृश्य’ गतिरोधकांचा कहर: निवडणूक तोंडावर डांबरीकरण, पण सुरक्षा शून्य!”
भरारी न्युज ( उत्तरेश्वर शिंदे 9156101056) अंबाजोगाई शहरातील रस्त्यांचे काम निवडणूक पिरेडमध्ये धडाक्यात करण्यात आले असले, तरी नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील अनेक गल्लीबोळांमधील जुने सिमेंट रस्ते त्यावर डांबरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक गल्लीमध्ये तसेच भगवान बाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गतिरोधक बसविण्यात आले आहेत. रस्ते सुंदर झाले असले तरी वाहतूक सुरक्षेचे नियम मात्र धाब्यावर बसविण्यात आले आहेत. गतिरोधकांवर कुठलीही व्हाईट पट्टी, झेब्रा मार्किंग किंवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. रस्ते गुळगुळीत आणि नवीन असल्याने वाहनांचा वेग वाढला आहे; पण गतिरोधकांची माहितीच नसल्याने चालक अचानक धडकतात आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नियमांनुसार प्रत्येक गतिरोधकावर स्पष्ट रंगसंगती, झेब्रा पेंट तसेच ‘स्पीड ब्रेकर’चे सूचना फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र अंबाजोगाई नगरपरिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांनी हे सर्व नियम पायदळी तुडवले असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांचे काम करून ‘दाखवण्यासाठी’ विकास करण्यात आला, परंतु सुरक्षा व्यवस्था शून्यावर गेली, अशी टीका होत आहे. नागरिकांची मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हालचाल करून सर्व गतिरोधकांवर व्हाईट पट्ट्या, दिशादर्शक बोर्ड आणि सुरक्षा चिन्हे लावावीत, अन्यथा वाढणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, हा प्रश्न प्रशासनाने उत्तरावा.



