आपला जिल्हाताज्या घडामोडी
होळ पशुवैद्यकीय दवाखाना बंद; डॉक्टर गायब, शेतकऱ्यांचे हाल
होळ पशुवैद्यकीय दवाखाना बंद; डॉक्टरांचा मनमानी कारभार शेतकऱ्यांचे हाल होळ (ता. केज) : तालुक्यातील होळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे शेतकऱ्यांना आणि जनावरांच्या मालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोमवारी (दि. २४) दुपारी साडेअकरा वाजता पत्रकार उत्तरेश्वर रघुनाथ शिंदे हे त्यांच्या कुत्र्याच्या पिल्लूच्या उपचारासाठी दवाखान्यात गेले असता, तेथील दवाखाना बंद असल्याचे दिसून आले. याच वेळी गावातील इतर शेतकरीही आपली जनावरे उपचारासाठी घेऊन आले होते, परंतु डॉक्टर अनुपस्थित असल्याने त्यांचीही गैरसोय झाली. शेतकऱ्यांची गैरसोय, डॉक्टरांचा बेफिकीरपणा गावातील अनेक शेतकरी आपल्या गाई-म्हशींसाठी वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी दवाखान्यावर अवलंबून असतात. मात्र, डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे त्यांना परत माघारी जावे लागले. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टरांनी सुटीबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस बोर्डवर माहिती न देता दवाखाना बंद ठेवल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, "मी परळीला गेलो आहे," असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. उत्तर देणार कोण? प्रशासनाचे दुर्लक्ष? डॉक्टरांचा असा बेजबाबदार वर्तनामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पशुवैद्यकीय सेवा ही शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असून, आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांची उपस्थिती महत्त्वाची असते. तरीही डॉक्टरांनी कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय आणि सूचना न देता दवाखाना बंद ठेवणे हे गंभीर आहे. संबंधित डॉक्टरांनी कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या कारणासाठी परळीला गेले, याचा खुलासा लेखी स्वरूपात करावा, अशी मागणी होत आहे. मनमानी संपवण्यासाठी कारवाईची मागणी शेतकरी आणि गावकरी या प्रकारामुळे संतप्त असून, अशा कामचुकार डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. जर वेळेवर उपचार न मिळाल्यास जनावरांचे जीव धोक्यात येऊ शकतात, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.




