आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना १० हजार द्या!…!  अशोक चव्हाण यांची विधानसभेत मागणी*.

Spread the love

मुंबई-(AR News नेटवर्क विशेष प्रतिनिधी विधानसभेतून सखाराम कुलकर्णी)छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)चे माजी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केलेल्या शिफारसीनुसार खरीप व रब्बी हंगामापूर्वी १० हजार रूपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

विधानसभा नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांबाबत सरकारचे धोरण ‘जखम गुडघ्याला अन् पट्टी डोक्याला’ अशा पद्धतीचे आहे. शेतकरी सन्मान योजनेत दर चार महिन्यांनी दोन हजार रूपये अनुदान देण्याऐवजी खरीप व रब्बी हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाली तर त्यांना पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीच्या खर्चासाठी मदत होऊ शकेल. यंदाच्या खरिपात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करताना पडझड झालेल्या घरांना पुरेशी भरपाई तसेच टपरीधारक व छोट्या व्यावसायिकांनाही मदत देण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली.
*जाहिरातीवरील खर्च कमी करा*
नोकरीची नियुक्ती पत्रे देण्याचे इव्हेंट करण्याची काय आवश्यकता आहे? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी राज्य सरकारच्या जाहिरातबाजीवरही टीकास्त्र सोडले. जाहिरातीच्या खर्चात बचत करून तो पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा. प्रचार-प्रसार व जाहिरातींसाठी डीपीडीसीतून पैसा खर्च करू नका, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नागपूर, मुंबई-पुणे-सोलापूर-हैद्राबाद आणि पुणे-नाशिक हे द्रुतगती रेल्वे प्रकल्प (बुलेट ट्रेन) घोषित करण्यात आले. मात्र, त्यातून मराठवाडा का सोडून दिला? अशी विचारणा करून त्यांनी जालना-नांदेड बुलेट ट्रेनचा मुद्दा उपस्थित केला.

*ट्रिपल इंजीनचा वेग मराठवाड्यातच का मंदावतो?*
लातूर-नांदेड थेट रेल्वे प्रकल्पाबाबत गेल्या अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना या रेल्वे प्रकल्पाला प्राधान्य देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी दिले होते. मात्र, अद्याप या प्रकल्पाचा साधा प्रस्ताव देखील केंद्राकडे पाठवण्यात आलेला नाही. राज्यात सरकार चालवायला ट्रिपल इंजीन आहे. हिरवी झेंडी दाखवण्यासाठी गार्डच्या रूपात मराठवाड्याचेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आहेत. तरीही मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न आले की ट्रिपल इंजीनचा वेग का मंदावतो, अशी विचारणा अशोक चव्हाण यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!