*1000 पुरणपोळ्या गरिबांना केल्या दान: अनिसचा होळी निमीत्त उपक्रम*
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद....!

सोलापूर:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखा आयोजित होळी करा लहान पोळी करा दान या उपक्रमा अंतर्गत सोलापूर शहरात एकूण 1000 पोळ्यांचे संकलन अनिसच्या तीन पुरणपोळी संकलन केंद्रात करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कमीत कमी आणि सुकी लाकडे व वाळलेला पालापाचोळा जाळून लहान होळी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले होते. तसेच या होळीमध्ये पुरणपोळी नैवेद्य म्हणून जाळून टाकण्यापेक्षा गरीब गरजू नागरिकास दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सर्व विचारांनी प्रेरित होऊन शहरातील असंख्य नागरिकांनी सदर केंद्रात अनेक पुरणपोळ्या दान केल्या

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जय हिंद फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरणपोळ्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये असणाऱ्या गरीब नागरिकांना देण्यात आल्या अशा पद्धतीने अनेक भुकेल्या गरिबांची सुद्धा होळी अत्यंत गोड झाली. जयहिंद फूड बँकेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी आणि अनिकेत सरवदे यांनी या उपक्रमात पोळ्या वाटप करण्यात मोलाचे सहकार्य केले.

विविध पुरणपोळी संकलन केंद्रावर अनिसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व पोळ्या जमा करण्यासाठी खूप कष्ट घेतले. अशा पध्दतीने पर्यावरण पूरक आणि समाज हितकारक कार्य करत समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला गेला. सर्व नागरिकांकडून या उपक्रमाचे खुप कौतुक करण्यात आले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेचे अध्यक्ष शंकर खलसोडे, कार्याध्यक्ष डॉ अस्मिता बालगावकर, सचिव ब्रह्मानंद धडके, जिल्हा अध्यक्ष व्ही डी गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष उषा शहा, विविध उपक्रम विभाग प्रमुख आर डी गायकवाड, केदारीनाथ सुरवसे, यशवंत फडतरे, मधुरा सलवारू, सुनीता गायकवाड, निनाद शहा, अरुण गायकवाड, प्रकाश कनकी, विजय जाधव, लालनाथ चव्हाण, धनाजी राऊत, शकुंतला सुर्यवंशी, संजीवनी देशपांडे, निलेश गुरव इ कार्यकर्ते उपस्थित होते.



