आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श राज्यकर्त्या, तत्त्वज्ञानी, न्यायनिष्ठ, राजमाता, धर्मरक्षणी, राष्ट्रमाता, विश्वमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९८ वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन

!! कुशल प्रशासक प्रजा वत्सल राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर !!

Spread the love

होळकर घराण्याचा इतिहास:अहिल्यादेवी होळकर या होळकर घराण्याच्या होत्या. होळकर घराणे हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील सातारा जिह्यातील फलटण तालुक्यातील होळ या गावचे. या घराण्याचे मूळपुरुष मल्हारराव होळकर यांना छत्रपतींनी माळवा प्रांताची सुभेदारी दिली. त्यांनी इंदौर संस्थानाची स्थापना केली. याच घराण्यातील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वत:चे राज्य स्वबळावर मिळवून राज्याभिषेक करून घेणारा एकमेव राजा `महाराजा यशवंतराजे होळकर’. तसेच भारतामध्ये रेल्वे चालू करण्यासाठी ब्रिटीशांना त्या काळात दोन कोटी कर्ज देणारे तुकोजीराजे होळकर हे याच घराण्यातले होत. त्याकाळात दिल्लीतील `रायसीना’ हा भूभाग होळकरांच्या अधिपत्याखाली होता. `रायसीना होळकर इस्टेट’मध्ये आज आपल्या देशाचे राष्ट्रपती भवन, संसद भवन, केंद्रीय सचिवालय आदी भव्य वास्तू दिमाखाने उभ्या आहेत. होळकरशाहीचे एकूण २२० वर्षे २२ दिवस राज्य होते. या दरम्यान होळकर घराण्याचे महापराक्रमी, रणझुंजार, शूर दानशूर, कर्तव्यतत्पर, रणसम्राट १४ राजे-महाराजे होऊन गेले. १६ जून १९४८ साली होळकरशाहीचे भारत देशात विलीनीकरण झाले.

अहिल्यादेवींचे बालपण ते राज्यकारभारची जबाबदारी:

अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातीला जामखेड तालुक्यातील चौंडी  या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्याकाळात स्त्रीशिक्षण प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यास व वाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर हे बाजीराव पेशव्यांचे जाहागिरदार होते. ते एके दिवशी आपल्या ताफ्यासह पुण्याकडे जात होते. तो मार्ग खाडीचा होता. अहिल्यादेवी मंदिराशेजारी खेळत होत्या. अहिल्यादेवीनां माहित होते की हा रस्ता खाडीचा आहे म्हणून त्यांनी मल्हारराव होळकरांना थांबविले हे मल्हाररावांना पहिल्यांदा आवडले नाही, परंतु अहिल्यादेवींनी जेव्हा सांगितले की, पुढे मोठी खाडी आहे. तेथुन प्रवास केल्यास जीवाला धोका होऊ शकतो. तेव्हा मल्हाररावांना जाणीव झाली की या आठ वर्षीय मुलीने आपल्याला मोठ्या संकटातून वाचवले. मल्हाररावांनी या आठ वर्षीय अहिल्यादेवीला सून करण्याचे मनोमन ठरविले. ती इच्छा त्यांनी पूर्ण केली. अहिल्यादेवी व खंडेराव यांचा विवाह १७३३ मध्ये संपन्न झाला. अहिल्यादेवी होळकर घराण्याची सून झाल्या. अहिल्यादेवी सासरी गेल्यानंतर त्यांच्या वागण्यातून सर्वांचे मन जिंकुंन घेतले. घराची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी राज्यकारभारची काही कामे सांभाळायला सुरुवात केली. कलातंराने अहिल्यादेवींना एक मुलगा आणि एक मुलगी देखील झाले. सुरुवातीला खंडेरावांच्या वागण्यामुळे त्यांना सुरूवातीला त्रास सहन करावा लागला. परंतु लवकरच त्यांनी खंडेरावांना आपल्या विश्वासात घेण्यात यशस्वी झाल्या. सर्व काही व्यवस्थित चालू आसताना अचानक पती खंडेराव होळकर यांना १७५४ च्या कुम्हरेच्या लढाईत वीर मरण प्राप्त झाले. हे अहिल्यादेवींचे फार मोठे नुकसान होते. त्याकाळात सती जाण्याची प्रथा होती. अहिल्यादेवी सती जाण्यास निघाल्या, परंतु मल्हारराव होळकर त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर १२ वर्षांनी मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला. मल्हाररावांच्या मृत्यू नंतर राज्याकारभाराची संपूर्ण जबाबदारी अहिल्यादेवींच्याकडे आली.

अहिल्यादेवींचे कार्य:
अहिल्यादेवीने आपल्या साम्राज्याचे रक्षण केले. त्यांनी अनेक लढाईत स्वत: सैन्याचे नेतृत्व केले आणि अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. अहिल्यादेवी न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या, परराज्याशी सलोख्याचे संबध रहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यात आपले वकील नेमले होते.इतर राज्यातील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. राजमाता अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या आपल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची हित व विकास, सामाजीक शांतता, सुव्यवस्था,समता व ममत्व, न्याय, स्वातंत्र्य या मुलभूत मानवी मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव त्या काळात जनता घेत होती.
ज्याकाळात दळणवळणाची साधने फारच कमी होती किंवा म्हटले तर नव्हतीच अशी परस्थिती होती अश्या काळात त्यांनी भारतातील तिर्थक्षेत्रे, मंदिरे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, घाट बांधले व त्यांचा जीर्णोद्धार केला. यामध्ये द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश करता येईल. त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली. आज ही वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेली स्थापत्य कला अहिल्यादेवीच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहेत. वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संकृतीचा वारसा तर जपलाच पण त्याच बरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले. त्यांच्या कामगिरीचा हा दुहेरी बाणा निश्चीतच अभिमानास्पद आहे 
अहिल्यादेवींच्या सन्मानार्थ व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने  २५ ऑगस्ट १९९६ रोजी टपाल तिकिट जारी केले. अहिल्यादेवींच्या कार्यास मानवंदना म्हणून इंदैरच्या विमानतळाचे नाव “देवी अहिल्याबाई होलकर हवाईअड्डा ” असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदैरच्या विद्यापीठास “देवी अहिल्या विश्वविद्यालय” असे नाव देण्यात आले आहे. तसेच, सोलापूर विद्यापीठाला “पुण्यश्लोक आहील्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ” असे नामकरण करण्यात आले आहे. अशा थोर तत्त्वनिष्ठ, समाजसुधारक, प्रजानिष्ठा, उत्कृष्ट प्रशासक, शूर, दानशूर, महापराक्रमी, महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी पुन:श अभिवादन!

प्रा.श्री.विजय वाघमोडे
वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय
सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!