आपला जिल्हाराजकीय
धनंजय मुंडे: “जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही, आमचा मार्ग फक्त विकासाचा”
अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी सर्वसमावेशक विकासाच्या विचारसरणीवर आधारित राजकारणाचा संकल्प व्यक्त केला. "जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता आम्ही केवळ विकासाचं राजकारण करतो. आज मी आणि माझी बहीण एकत्र आलो आहोत, त्यामुळे विकासकामांसाठी आमची शक्ती दुप्पट झाली आहे. मी कधीही मागे हटणार नाही, ना हरणार; जनतेच्या विकासाचा वसा कधीच सोडणार नाही," असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले. धनंजय मुंडे यांनी मागील निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. "काही कामे मंजूर झाली आहेत, तर काहींची सुरुवात झालेली आहे. उर्वरित विकास कार्य येत्या काळात पूर्ण करणार," असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बर्दापूर ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या सभेत माजी खासदार प्रीतमताई मुंडे, माजी आमदार संजय भाऊ दौंड आणि आमदार पंकजाताई मुंडे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात, "आज मी माझ्या भावाच्या प्रचारासाठी आले आहे, घड्याळाचे बटन दाबण्याची वेळ आली आहे," असे म्हणत जनतेला भावनिक आवाहन केले. "आज आम्ही दोघे एकत्र आलो आहोत, म्हणून अनेक जण ढोंग करत आहेत. आम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांच्या शिकवणीवर काम करत आहोत आणि तुमच्या पाठिंब्याने विकासाची नवी दिशा निर्माण करू," असेही त्यांनी सांगितले. यावेळी, लोकसभेतील पराभव विसरून नवा निर्धार करण्याचे आवाहन करत, पंकजाताई म्हणाल्या, "मी माझ्या भावाच्या सोबतीने आता पुढाकार घेतला आहे. माझ्या मतांनी माझ्या भावाला विजयी करण्याची जबाबदारी तुमची आहे." माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे आणि माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी देखील धनंजय मुंडेंना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. सभेला पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, श्याम आपेट, अविनाश मोरे, शिवाजीराव शिरसाट, प्रशांत पाटील, तसेच इतर मान्यवरांचा सहभाग होता.
