आपला जिल्हाताज्या घडामोडी
अध्यापकाचार्य डॉ. अब्दुल नजीब यांचा MSCERT, पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत विभागीय यश
MSCERT, पुणे यांनी आयोजित केलेल्या नवोपक्रम स्पर्धेत शासकीय डी.एल.एड. कॉलेज नेकनूरचे अध्यापकाचार्य डॉ. अब्दुल नजीब यांनी 'व्हिडिओ एडिटिंग करणे व YouTube वर अपलोड करणे' या नवोपक्रमाच्या माध्यमातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रशिक्षणार्थी शिक्षकांसाठी माहिती सादर करण्याच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला विभागीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. दरवर्षी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे, शिक्षणातील नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेमध्ये शिक्षक, सहाय्यक शिक्षक, विषयतज्ञ, अध्यापक, आणि शैक्षणिक क्षेत्रातील इतर जबाबदार व्यक्ती सहभागी होऊन त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची मांडणी करतात. या स्पर्धेचे उद्दिष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व आनंददायी शिक्षणप्रक्रिया रुजवणे हे आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर करून शैक्षणिक क्षेत्रात सर्जनशीलता आणली जाते. यातील सर्वोत्तम उपक्रमांना जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावर निवडून प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान केली जातात. या वर्षीच्या स्पर्धेत उर्दू माध्यमातील शिक्षकांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला. बीड येथील ब्लॉक रिसोर्स सेंटर, पंचायत समितीचे गणित व विज्ञान विषय तज्ञ मोहम्मद इसहाक मोमीन आणि शासकीय डी.एल.एड. कॉलेज नेकनूरचे डॉ. नजीब सौदागर यांनी विभागीय पातळीवर अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळवला. डॉ. अब्दुल नजीब यांच्या या यशाबद्दल त्यांचे सहकारी, विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यांचे अभिनंदन केले असून राज्यस्तरावरही त्यांनी उच्च स्थान मिळवावे, अशी शुभेच्छा दिल्या आहेत.




