आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

*लोकसभा निवडणुकीसाठी आज दि.26 ला नांदेड जिल्‍ह्यात मतदान*

Spread the love

नांदेड -(सखाराम कुलकर्णी)अठराव्‍या लोकसभेसाठी जिल्हा प्रशासनाची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून आज शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ होणार आहे. आज दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व पोलींग पार्ट्या मतदान केंद्रावर सुखरुप पोहोचल्‍या आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील एकूण 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार असून २३ उमेदवार रिंगणात आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्‍येने आपल्‍या मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आला आहे.

जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्‍हावाशियांना आवाहन करतांना आपल्‍या संदेशात जनतेने मोठ्या संख्‍येने मतदान केंद्रावर पोहोचावे, अशी विनंती केली आहे. मतदान केंद्रावर उन्‍हापासून बचावासाठी प्रतिक्षालय उभारण्‍यात आली असून पिण्‍याच्‍या पाण्‍यासह आवश्‍यकतेनुसार आरोग्‍य विषयक उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. गेल्‍या ७५ दिवसांपासून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी कार्यरत असून उद्या शुक्रवारची सुटी मतदानासाठीच उपयोगात आणा असेही त्‍यांनी आपल्‍या संदेशात म्‍हटलेले आहे. उद्या संनियंत्रण कक्षातून जिल्‍ह्यातील सर्व यंत्रणेवर आपले लक्ष राहणार असून निर्भय होऊन आपला मताधिकार वापरण्‍याचे सांगितले आहे.

18 लक्ष 51 हजार मतदार

नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (294409), नांदेड उत्तर (346886), नांदेड दक्षिण (308790), नायगाव (301299), देगलूर (303943), मुखेड (296516) असे एकूण 18 लक्ष 51 हजार 843 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये 9 लक्ष 55 हजार 84 पुरुष तर 8 लक्ष 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.
10 हजार 637 कर्मचारी कार्यरत
नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी 10 हजार 637 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष 2766, इतर मतदान अधिकारी 7921, क्षेत्रीय अधिकारी 242, याशिवाय मायक्रो ऑब्जर्वर 39, होम वोटींग करीता 50, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे.
7 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी
नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये पोलीस बंदोबस्‍तासाठी एक जिल्‍हा पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक, 12 पोलीस उपअधीक्षक, 245 अधिकारी, 4272 अंमलदार, 2500 होमगार्ड याशिवाय 6 सीआरपीएफ कंपन्‍या असा तगडा पोलीस बंदोबस्‍त लावण्‍यात आलेला आहे.

मोबाईल वापरावर बंदी

आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक पोलिस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्राच्‍या परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. त्‍यामुळे मोबाईलशिवाय मतदान करावे. मतदार, निवडणूक कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रावर प्रतीक्षालय

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान करावे असे आवाहन करताना जिल्हा प्रशासनाने यावेळी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय उभारले आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सावलीची व्यवस्था, रांगेविरहित मतदान, व्हीलचेअरची व्यवस्था, हिरकणी कक्ष व पाळणा घर, आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे.

महिला सखी केंद्र तयार

जिल्‍ह्यात 16 ठिकाणी महिला व्यवस्थापनातील मतदान केंद्र आहेत. ते आजच सायंकाळी मतदारांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज झाले आहे.
जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांची यादी नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार 62 मतदान केंद्र असून त्यापैकी 32 मतदान केंद्र संवेदनशील केंद्र म्हणून घोषीत केली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!