*अशोकरावांच्या मागे भाजपात आलेले कार्यकर्ते अजूनही विचाराने काँग्रेसचेच*

नांदेड – (राजकीय विश्लेषण- सखाराम कुलकर्णी) काही वैयक्तिक कारणामुळे अशोकरावांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला व त्यांचे पाठोपाठ लगेच काँग्रेस पक्षामधील बरेच कार्यकर्ते भाजपात आले व अजूनही आवक चालूच आहे. पण ते कार्यकर्ते शरीराने भाजपामध्ये असले तरी अजूनही विचाराने काँग्रेसचेच आहेत असे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून दिसत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली त्या अगोदर नांदेड जिल्ह्यात काँग्रेस मधून भाजपामध्ये आवक मोठ्या प्रमाणावर झाली व अजूनही होत आहे तर ही आवक म्हणजे भाजपमध्ये नसून अशोकराव लिमिटेड पार्टीत आवक झाली असे भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे. भारतीय जनता पक्षाची शिस्त व विचारधारा फार वेगळी आहे. यांना अजूनही भाजपा समजलाच नाही .ते सत्तेसाठी व काही कारणासाठी, कोणी भीतीने भाजपात येत आहेत. सध्याची नांदेडची भाजपा पार्टी आवक झालेल्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची असून भाजपाचे जुने कार्यकर्त्यांची राहिली नाही ,अशी खंत निष्ठावंत व्यक्त करत आहेत. भाजपाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आयुष्य पाई फिरून सतरंज्या उचलण्यात गेले. तर आताच्या भाजपात आवक झालेल्या नेत्यांचे आयुष्य चार – चार गाड्यात फिरवून विविध व्यवसाय करून कोट्यावधीची मालमत्ता सावडण्यात जात आहे. अशोकरावांचे व चिखलीकरांचे राजकीय हार्डवेअर होते. पण अशोकरावांना भाजपात येणे गरजेचे होते. अशोकराव भाजपात आले की नुकतेच काही महिन्यापूर्वी भाजपमधून काँग्रेसमध्ये स्वगृही गेलेले भास्करराव पाटील खतगावकर आपल्या लव्या- जम्या सह पुन्हा भाजपात आले. भास्करराव काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस अशोकराव कडून त्यांना मानसन्मान मनासारखा मिळत नव्हता व पुढील भविष्य दिसत नव्हते,म्हणून ते २०१९ च्या वेळेस भाजपात गेले होते. पण भाजपातही प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कडून मानसन्मान मिळत नव्हता, म्हणून भास्करराव नाराज होऊन पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये गेले. आता नुकतेच अशोकराव भाजपा आले की भास्करराव पुन्हा भाजप आले. मात्र भाजपातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रतापराव पाटील चिखलीकरांनी बाजूला फेकलं. पण ते निष्ठावंत कोणत्याही पक्षात गेले नाही. घरी राहून भाजपाची विचारधारा जोपासत आहेत. असे चित्र सध्या नांदेड येथील भाजपामध्ये दिसत आहे. त्यामुळे भाजपा हा संघाच्या विचारसरणीत राहिलेला भाजप आहे. की काँग्रेसच्या विचारसरणीतील निर्माण झालेला भाजपा आहे हा प्रश्न जनतेसह भाजपातील काही कार्यकर्त्यांना पडत आहे.



