पवना धरण ७७ टक्के भरले
कामशेत : मावळ तालुक्यात सलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. धरण ७७ टक्के भरले आहे.मावळात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. शनिवार व रविवारी तुरळक प्रमाणात पाऊस पडला. पावसाचा जोर ओसरला असल्याने पूर सदृश परिस्थिती आता आटोक्यात आली आहे.
मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण आता तब्बल ७७ टक्के भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे मावळवासीयांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे असे दिसत आहे.
जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली मात्र त्यानंतर काही दिवसातच तालुक्यात पावसाने दडी मारली त्यामुळे धरणातील पाणीसाठा खालावला होता त्यामुळे मावळवासी पाण्याच्या बाबतीत थोडे चिंतीत असल्याचे चिन्ह होते मात्र काही दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मावळ तालुका सुखावला आहे.



