तळेगावातील विठ्ठल मंदिरामध्ये श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न
तळेगाव : श्रीसंत तुकाराम महाराज बीज सोहळा रविवार ( दि २० मार्च) रोजी तळेगावातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये साजरा झाला. या सोहळ्यानिमित्त नादब्रम्ह संगीतालय आणि कलापिनी प्रस्तुत “अभंगवाणी” हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

श्री विठ्ठल मंदिर हे तळेगावातील अत्यंत प्राचीन असं स्थान आहे. संत तुकाराम महाराजांनी जिथे प्रत्यक्ष कीर्तन सेवा केलेली आहे त्याठिकाणी कायमच त्यांचा सहवास त्यांचा वावर हा भक्तगणांना जाणवत असतो. परंतु काल सादर झालेल्या अभंगवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ तुकोबांचा नाही तर सकल संतांचा सहवास हा तळेगाव करांना लाभला. संत ज्ञानेश्वरांपासून, संत नामदेव, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत अमृतराय, संत सोहिरोबानाथ, संत भानुदास अशा अनेक संतांच्या रचनांचा सर्वव्यापक समावेश या कार्यक्रमामध्ये होता. कार्यक्रमाची सुरुवात संतनामांच्या गजराने झाली. विनायक लिमये आणि संपदा थिटे यांनी त्यांच्या प्रवाही, सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गुरुंच्या पावलावर पाऊल ठेवून विराज सवाई, स्वप्नील झळकी, सावनी परगी, अक्षय म्हाप्राळकर या नवोदित गायकांनी सुद्धा त्यांच्या गायकीने भक्ती सुखाचा आनंद सर्व श्रोत्यांना दिला. या भक्तीगीतांना अतिशय समर्पक अशी साथ लाभली ती वाद्यवृंदाची. प्रदीप जोशी यांची संवादिनी, मंगेश राजहंस यांचा तबला, गोरख कोकाटे यांचा पखवाज, अनिरुद्ध जोशी याचे टाळ आणि विनायक लिमये यांच्या हातातील चिपळ्या – या सर्व वादकांनी तिथे उपस्थित प्रत्येक रसिकभक्ताला श्रीविठ्ठलाच्या भजनामध्ये अक्षरशः गुंतवून ठेवलं. माधुरी ढमाले- कुलकर्णी हिच्या निवेदनातून सर्व संतांचा सत्संग रसिकांना घडला. कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी जेव्हा सादर झाली तेव्हा विठ्ठलही कमरेवर हात ठेवून डोलला असेल इतकी सुंदर बांधणी या कार्यक्रमाची केली गेली होती. कलाकार, रसिकश्रोते आणि श्रीविठ्ठल अशी त्रयी या कार्यक्रमामध्ये तल्लीन झाली आणि अवघा रंग एक झाला ची अनुभूती तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आली. “अभंगवाणी” या संपूर्ण कार्यक्रमाचं उत्तम ध्वनी संयोजन केदार अभ्यंकर यांनी केलं.

गेली १६ वर्ष कलापिनी बीज सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये कलासेवा करते आहे. ही संधी दिल्याबद्दल डॉ. अनंत परांजपे यांनी श्रीविठ्ठल मंदिर संस्थानचे आभार मानले. या सोहळ्याचे प्रायोजक संतोष खांडगे आणि रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते डॉ अनंत परांजपे आणि सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला. सुलोचना खांडगे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा संपदा थिटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ह. भ. प. माऊली दाभाडे यांनी औपचारिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.




