ताज्या घडामोडी

शोध -“माझ्यातल्या मी चा”…..डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

आपण स्वकष्टाने मिळवलेल्या विविध संपत्तीची प्रगती पाहून सहाजिकच आपण सुखावतो! आपल्या कौटुंबिक व्यवसायिक सामाजिक प्रगतीचा विचार करता आर्थिक दृष्ट्या आपण किती संपन्न आहोत!- समृद्ध आहोत याच दृष्टिकोनातून आपल्या प्रकृतीकडे आपण आणि समाज बघत असतो!

Spread the love

शोध -“माझ्यातल्या मी चा”-

आवाज न्यूज : डॉ. शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे. २ डिसेंबर.

-आपण स्वकष्टाने मिळवलेल्या विविध संपत्तीची प्रगती पाहून सहाजिकच आपण सुखावतो! आपल्या कौटुंबिक व्यवसायिक सामाजिक प्रगतीचा विचार करता आर्थिक दृष्ट्या आपण किती संपन्न आहोत!- समृद्ध आहोत याच दृष्टिकोनातून आपल्या प्रकृतीकडे आपण आणि समाज बघत असतो! अर्थात हे काही चूक नाही पण मित्रांनो — काही बाबतीतमात्र प्रगती ही अशी मोजण्याच्या पलीकडेही असू शकते- याची जाणीव आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत उपयोगी पडते- हे शाश्वत सत्य आहे!  आपल्या संपत्तीत किती वाढ झाली हा आकडा आपण दाखवू शकतो पण –आपण आजपर्यंत कोणत्या चांगल्या गोष्टी शिकलो?

कोणती नवीन कौशल्ये प्राप्त केलीत? आपल्या स्वभावात कोणते चांगले बदल केलेत? कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घेतल्यात? कोणत्या वाईट सवयी आपण सोडून दिल्यात? या सर्व प्रश्नांची उत्तर शांत चित्ताने आपणच शोधायची आहेत! हीच प्रश्नांची उत्तर आपल्या प्रगतीची योग्य दिशा आपल्याला दाखवतील! मित्रांनो हाच खरा प्रगतीचा अर्थ मला अभिप्रेत आहे! आज माझ्यात किती आणि कोणते सद्गुण आहेत? त्यात आज पर्यंत मी किती वाढ केली आहे- यावरच माझ्या आयुष्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत जाणार आहे! याची मला आज जाणीव होणे म्हणजेच माझ्यातील मी चा शोध मला लागणे -हेच खरे प्रत्येकाच्या प्रगतीच्या बाबतीत अभिप्रेत आहे! आयुष्याच्या या तळावर आपला बँक ब्यालन्स/ स्थावर मालमत्ता याचा आपण विचार करतोच! ते स्वाभाविकच आहे- तो माझा अधिकारच आहे– पण त्याचबरोबर आपल्यातील सद्गुणांच्या प्रगतीचा विचार न केल्यास आपल्या प्रगतीची ही संकल्पनाच चुकीची ठरेल! मित्रांनो म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्वाकडे एक साक्षी या– दृष्टिकोनातून पाहणे- म्हणजेच खऱ्या अर्थाने आपणच आपला आत्मशोध घेणे! आपल्या ऐहिक प्रगतीकडे बघण्याचा दृष्टिकोण{ ॲटीट्युड} आपण बदलला तर- आपण जगात केवळ जगण्यासाठी नव्हे तर- जग जिंकण्यासाठी आलेलो आहोत- याची अनुभूती आपल्याला प्राप्त होईल.

Cc हा जो मी आहे जोपर्यंत– त्याला जाग ठेवतो तोपर्यंत– बाहेरचा प्रकाश आपल्यात येऊ शकत नाही ! यासंदर्भातील आपला अनुभव नोबेल पारितोषिक विजेते, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. यांनी आपल्या रोजनिशीत अतिशय सुरेख अशा शब्दात लिहून ठेवलेला आहे ते लिहितात की—मी जेव्हा गीतांजलीचे लेखन करीत होते तेव्हा ते पद्मा नदीत एका नावेत बांधलेल्या झोपडीत राहत होते! एके दिवशी रात्री ते आपल्याच नादात लिहिण्यात दंग झाले होते आणि त्यावेळी त्यांनी झोपडीत एका मेणबत्तीच्या प्रकाशात आपलं लिखाण चालू ठेवलं होतं! गीतांजली च्या लिखाणाचं त्यादिवशीच त्यांनी ठरवलेलं लिखाण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ती मेणबत्ती विझवून टाकली आणि क्षणभर त्यांना सहाजिकच अंधार या झोपडीत पसरल्या सारखा वाटला! पण दुसऱ्याच क्षणी सर्व बाजूंनी चंद्राची किरणे त्या छोट्याशा झोपडीत शिरली आणि झोपडीच्या प्रत्येक छिद्रातून त्या चंद्र किरणांनी प्रवेश करताच ती झोपडी शितल अशा चंद्र प्रकाशाने उजळून निघाली!– कारण त्या दिवशी पौर्णिमा होती हे ते विसरूनच गेले होते आणि कर्मधर्मसंयोगाने त्या दिवशीच गीत हे पौर्णिमे वर् आधारलेलं होतं! झोपडीत पसरलेला तू चंद्र प्रकाश पाहून एका विलक्षण अनुभूतीने आनंदाने रवींद्रनाथांचं ओसंडून वाहायला लागलं त्यासंदर्भातील टागोरांनी आपल्या रोजनिशीत असं वर्णन केलेल आहे की—रवींद्रनाथ टागोर म्हणतात की आज एक अपूर्व अनुभव मला आला की— जोपर्यंत हा अहंकाराचा म्हणजेच मीपणाचा दिवा आपल्या मनात जळत असतो तोपर्यंत परमात्मस्वरूप पौर्णिमेचा चंद्र आपल्या अंतकरणात प्रवेशही करीत नाही व त्याचा तेथे प्रकाशही पडत नाही!पूजनीय गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की– मी पणाचे मरणे म्हणजेच परमेश्वराचे होणे! आणि मित्रांनो महाराजांनी ही खरोखरच शाश्वत सत्य सांगितलेले आहे! कारण माणूस स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि विज्ञानाच्या साह्याने अंतराळात जाऊन पोहोचलेला आहे पण पण त्याच्या मी मुळे तो अंतकरणात जाण्यास अपयशी ठरला आहे हे “बाळासाहेब भारदे” यांनी सांगितलेलं सत्य आपण नाकारू शकत नाही!

खरोखरच आपल्यातला मी संपला की स्वास्थ्य आणि आनंद याव्यतिरिक्त जीवनात काहीच उरत नाही! म्हणूनच मित्रांनो हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे की आपल्याच आनंदाच्या शांततेच्या आड आपणच येतो! यासाठी हा आपला अडथळा दूर होणे महत्वाचं आहे! तसं थोडं अवघड असलं तरी निश्चित शक्य मात्र आहे! यालाच कबीर सहजयोग म्हणतात!  जर प्रयत्नपूर्वक हा आपल्यातला मी जर मिटला तर आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने व्यापून राहील ! आपल्याला राहत्या वास्तूत प्रतिदिनी गंगास्नान घडेल! एवढेच नव्हे तर तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला तीर्थस्थळी जाण्याचं पुण्य प्राप्त होणार आहे! अर्थात ही अनुभूती येण्यासाठी मूळ आपल्यातला जर मी गेला नाही तर सर्व प्रार्थना पूजा तीर्थयात्रा सगळं सगळं व्यर्थ आहे! किनाऱ्यावर बसून सागराची खोली आपल्याला कधीच आजमावता येत नाही तसेच मी पणाला धरून इतरांच्या हृदयात आपल्याला कधीच उतरता येत नाही!असे वरील विचार मनात आणून मी स्वतःला आणि माझ्या मनाला सतत बजावत असतो पण पण दुर्दैवाने माझ्यातला तो मी माझ्या मनात परत परत डोकावतो! त्याचा लय केव्हा होईल या दिवसाची मी अतिशय आतुरतेने वाट बघतो आहे खरंतर त्या नंतरच्या अनुभूतीची प्रतीक्षा मला आहे!

डॉक्टर शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!