कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटनस्थळी १४४ कलम लागू
लोणावळा : कोरोना पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचं निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने आज पासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी केल आहे.
भुशी डॅम ,घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट ,मंकी पॉईंट, अमृतांजन ब्रीज, एकविरा मंदिर परिसर वेहेरगाव ,टायगर पॉइंट, लायन पॉइंट, कार्ला लेणी ,भाजे लेणी ,लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर, तिकोना किल्ला, पवना धरण परिसर भाजे धबधबा या ठिकाणी एक किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हे नियम लागू राहतील.



