कलापिनीचे पारितोषिक विजेते “सय सरी” पुणे नाट्यसत्ताक महोत्सवात सादर……
जिंकली रसिकांची मने....
कलापिनीचे पारितोषिक विजेते “सय सरी” पुणे नाट्यसत्ताक महोत्सवात सादर…….जिंकली रसिकांची मने….
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, १८ जानेवारी.

पुण्यात अत्यंत मानाचा समजला जाणारा नाट्यसत्ताक महोत्सव १३ जानेवारी पासून पुण्यातील वेगवेगळ्या नाट्यगृहात सुरू आहे. या नाट्यमोहत्सवात वर्षभरातील जी दर्जेदार नाटकं असतात त्यांना सहभागी होण्याचा मान मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून कलापिनी तो मान पटकावत आहे.

या वर्षी कलापिनीने मौनांतर करंडक २०२१ प्रथम विजेते मूकनाट्य “सय सरी” हे ह्या महोत्सवात सादर केले. ह्या नाटकात एका लहानग्याचा एकटेपणापासून ते एकांतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अश्या ह्या निःशब्द सरींची कविता म्हणजे “सय सरी”. या मूकनाट्याची कथा संकल्पना गंधार जोशी आणि चेतन पंडित यांची आहे. नाटकाचे दिग्दर्शन सायली रौंधळ हिचे आहे.. डॉ.विनया केसकर, संदीप मन्वरे आणि वेदांग महाजन यांच्या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. वेदांग महाजन या लहान मुलाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला मौनांतर स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे बक्षीसही मिळाले होते. नाटकाचे संगीत- शार्दूल गद्रे आणि प्रणव केसकर. प्रकाशयोजना – विनायक काळे, स्वच्छंद, हृतिक पाटील. नेपथ्य – प्रतीक मेहता, हेमंत आपटे, चैतन्य जोशी, आदिती आपटे, आदित्य धामणकर यांनी केले आहे.

१५ जानेवारी रोजी पुण्यातील बॉक्स थिएटर येथे प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादात “सय सरी” सादर झाले. याप्रसंगी कलापिनीचे विश्वास देशपांडे, अंजली कऱ्हाडकर आणि श्रीपाद बुरसे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अभिजित पेंढारकर, आशुतोष पोतदार आणि पराग पोतदार आदी मान्यवर लेखक उपस्थित होते.
चांगला विषय, छोट्या स्टेजवर तुम्ही सादरीकरण छान केलंत. नेपथ्य, वावर आणि प्रॉपर्टीचा वापर करून दृश्य सादर करणं आवडलं अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली.
नाटक खूप छान झाले.कथा नाजूक भावनांची, हृद्य झाली. टीम वर्क जाणवतेच. पण इतकी तरल भावना,मनोवस्था दाखवावी असे टीम ला ही वाटणे हे कौतुकास्पद!.
या प्रसंगी वाईड विंग्स मीडिया यांच्याकडून कलापिनी संस्थेचा सन्मान करण्यात आला, तसेच कलापिनीनेही एक छानसं स्मृतीचिन्ह देऊन वाईड विंग्स चे प्रतिनिधी म्हणून मा. कुशल खोत यांचा सत्कार केला. अशी माहिती विश्वास देशपांडे, कलापिनी तर्फे देण्यात आली.



